पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २८- रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात सत्तेत असणारी महायुती आणि विरोधी पक्ष यांची उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात महायुती मधील घटक पक्षांची जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत युती होणार की स्वतंत्र लढणार असा तिढा कायम असताना निजामपूर विभागात भारतीय जनता पार्टी स्वबळावर दोन्ही निवडणुका लढवणार असल्याचे सूचक विधान माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे मा. अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा चिटणीस गोविंद कासार यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
माणगाव तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा निजामपूर विभाग या विभागात रायगड जिल्हा जिल्हापरिषदेचा १ मतदारसंघ तर माणगाव पंचायत समितीचे २ पंचायत समिती गण येतात. यामध्ये जिल्हापरिषद उमेदवारासाठी सर्वसाधारण खुला तर पंचायत समिती गण उमेदवारीसाठी एका गणासाठी अनुसूचित जमाती तर पाटणूस गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.
यामध्ये जिल्हापरिषद निवडणूक आणि पंचायत समिती उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अप) गटामध्ये रस्सीखेच सुरू असताना या जागेवर भारतीय जनता पार्टीने देखील दावा केला आहे. याकरिता माणगाव तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे मा. अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा चिटणीस गोविंद कासार यांनी निवडणूक लढविण्याच्या मानस व्यक्त केला आहे. कासार हे कोस्ते खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी राज्यात भाजपप्रणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असताना पंचायत समिती निवडणुक देखील लढविली आहे. त्यांची राजकीय सुरुवात भाजप निजामपूर विभाग अध्यक्ष, माणगाव तालुका समन्वय समिती सदस्य अशी झाली असल्याने त्यांचा या विभागात जनसंपर्क देखील दांडगा आहे. यामुळे या विभागात भाजप उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास किंग ठरणार की, किंगमेकर ठरणार..!? अशी चर्चा निजामपूर विभागात जोरदार रंगली आहे.



































