पोलीस प्रवाह न्युज
महाड, दि. २४- महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कारखान्यावर छापा टाकून पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ८८.९२ कोटी किंमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून या कारवाईमध्ये चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी इक्बाल चांदखा शेख वय ३५ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन महिन्यापासून महाड औद्योगिक वसाहती मधील प्लॉट क्रमांक ई २६/३ येथील रोहन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या केटामाईन या अंमली पदार्थाची निर्मिती होत आहे.

या माहितीच्या आधारे बुधवार दिनांक २३ जुलै रोजी पोलीस अधीक्षक श्रीमती ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाड औद्योगिक वसाहत पोलीस, महाड शहर पोलीस, पोलादपूर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ( एलसीबी ) अलिबाग व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग ( NBC) यांनी संयुक्तपणे कारवाई करीत छापा टाकला. या वेळी रोहन केमिकल प्रा.लि.या कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या किटामाईन हा अंमली पदार्थ तयार करताना आरोपींना रंगेहात पकडले. या वेळी ३४ किलो किटामाईन पावडर, १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकुण ८८ कोटी ९२ लाख २५ हजार रुपय किमतीचे किटामाईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मच्छिंद्र तुकाराम भोसले रा.जितेमहाड , सुशांत संतोष पाटील रा. मोहोप्रे महाड , शुभम सदाशिव सुतार रा.पाचगाव करवीर कोल्हापूर, रोहन प्रभाकर गवंस रा.चिंचोली बंदर मालाड वेस्ट या चार आरोपीं विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ चे कलम ८(सी), २२(सी), २५, २७(अ), २९, ४2, बी एन एस २०२३ चे कलम ३(५) अन्वे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी मोठी साखळी असून, पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. दरम्यान या कारवाई पथकात विशेष मदत अँटी नार्कोटिक्स ब्रांच मुंबई यांच्या पथक आणि एलसीबी चे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली.




































