पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १२- माणगाव तालुक्याला दोन मंत्री पदे मिळूनही शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. राजकीय शह आणि काटशहाच्या राजकारणात लोकांचे मरण स्वस्त आणि सोपे झाले आहे. दोघांच्या भांडणात शासनही कानाडोळा करत आहे. अपघातात दररोज लोकांचे नाहक बळी जात आहेत. याचे नेत्यांना सोयरसुतक नाही. त्यामुळे माणगाव शहरातील तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अधांतरी लटकला आहे. तसाच माणगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लोकांच्या जीवांवर नाहक येत आहे. येथील स्थानिक प्रशासन हतबल आहे. नेत्यांनी कानावर हात ठेवले आहेत. यामध्ये जनता आणि व्यावसायिक प्रचंड भरडले जात आहेत. दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच तात्पुरती उपाययोजना देखील करण्यात आली नाही. माणगावची जनता म्हणजे मुके बिचारे, कोणीही हाका अशी बिकट अवस्था झाली आहे. एकवेळ पालकमंत्री पदाचा प्रश्न आपल्या राजकीय स्वार्थापोटी सोडवून घेतील. परंतु हा माणगावच्या वाहतूक कोंडीचा फेरा सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार नाहीत असेच दिसते आहे.
काही महिन्यांपूर्वी माणगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक झाली होती. परंतु पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. पुन्हा एकदा माणगावला वार्यावर सोडून दिले आहे. माणगावला दोन मंत्री मिळाले आहेत. परंतु वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच राहीला आहे. यामुळे माणगावच्या जनतेची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरण करणार्या ठेकेदारावर वेळेत काम पूर्ण न केल्याने तातडीने कारवाई करुन एकावर थेट गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराला नियुक्त करण्यात आले आहे. तोपर्यंत मात्र पाऊस जवळ आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कामे होणार नाहीत. दरम्यान वाहतूक कोंडीतून किमान वर्षभर तरी सुटका होणार नाही असे दिसत आहे.
मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न देशाच्या संसदेत आणि राज्याच्या विधानसभेत वारंवार उपस्थित केला गेला होता. परंतु १७ वर्षे झाली तरी लोकप्रतिनिधी हातावर हात ठेवून आहेत. हा संपूर्ण कोकणचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही हे दुर्दैव आहे. पत्रकार आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केली. त्यांना आश्वासनाचे गाजरं दाखविण्यात आली आहेत. या महामार्गानंतर समृद्धी आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध महामार्ग झाले. माणगाव मधील अवघड असा दिघी पुणे महामार्ग झाला. परंतु या महामार्गाला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने २५ वर्षे कोकण मागे पडल्याचे वास्तव दिसत आहे.
बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे होते. तेव्हा पासून या महामार्गाचे काम सुरू झाले आहे. आजपर्यंत चार ठेकेदार तर पाच सरकारे आली तरीही या मार्गाला गती आणि चालना मिळाली नाही. सर्व बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्री येऊन आश्वासन देतात आणि पुढे काहीच होत नाही. याबद्दल प्रचंड संताप आणि राग लोकांच्या मनात आहे. मात्र उद्रेक होत नाही तोपर्यंत मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
माणगाव मध्ये भादाव आणि कालवा मोरबा मार्गांचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु नेत्यांची इच्छाशक्ती आणि आत्मियता दिसत नाही. नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे हा मुंबई गोवा महामार्ग रखडलेल्या अवस्थेत आहे. या दुरवस्थेबाबत कधी उद्रेक होईल हे सांगता येत नाही असे दिसत आहे.


































