२५ ते ३० फूट खोलीवर आढळला मृतदेह; रायगडच्या दोन रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांना यश
पोलीस प्रवाह न्यूज
ताम्हिणी घाट : दि. ३ – ताम्हिणी घाटातील मिल्कीबार वॉटरफॉलच्या कुंडात बुडालेल्या २२ वर्षीय आयुष शिवसिंग नेगी या तरुणाचा मृतदेह अखेर शोधून काढण्यात रायगड जिल्ह्यातील दोन रेस्क्यू टीमला यश आले. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुमारे साडेचार तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कुंडाच्या तब्बल २५ ते ३० फूट खोलीवर तरुणाचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शिवसिंग नेगी हा सध्या भुकूम, पिरंगुट, जिल्हा पुणे येथे वास्तव्यास होता. त्याचे मूळ गाव ऋषिकेश, उत्तराखंड येथील आहे. तो पुणे जिल्ह्यातील PIBM कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. मित्रांसोबत मिल्कीबार वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आलेला असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली. SVRSS (सह्याद्री वन्यजीव रक्षक सामाजिक संस्था) रेस्क्यू टीम, कोलाड, ता. रोहा यांचे लीडर सागर दहिंबेकर तसेच शेलार मामा रेस्क्यू टीम, भिरा-पाटणूस, ता. माणगावचे मुख्य लीडर प्रकाश शेलार (शेलार मामा) यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही रायगडच्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या.
कुंडाची खोली, पाण्याची परिस्थिती आणि अंधार यामुळे शोधकार्य आव्हानात्मक ठरत होते. मात्र रेस्क्यू पथकांनी परिस्थितीची पर्वा न करता अथक प्रयत्न सुरू ठेवले. तब्बल २५ ते ३० फूट खोलीपर्यंत शोध घेतल्यानंतर आयुष नेगी याचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती रेस्क्यू टीमकडून देण्यात आली आहे.
रायगडच्या रेस्क्यू टीमचे कौतुक
पुणे जिल्ह्यातील दुर्घटनेत शोधमोहीम राबविताना रायगड जिल्ह्यातील SVRSS कोलाड आणि शेलार मामा रेस्क्यू टीम भिरा-पाटणूस यांनी दाखविलेली तत्परता आणि अथक प्रयत्न महत्त्वाचे ठरले. प्रतिकूल परिस्थितीतही शोधमोहीम सुरू ठेवून तरुणाचा मृतदेह शोधण्यात पथकांना यश आले. या घटनेनंतर मिल्कीबार वॉटरफॉल परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः खोल कुंड, पाण्याचा अंदाज न येणे आणि धोकादायक ठिकाणी पर्यटकांकडून होणारे प्रवेश यामुळे अशा पर्यटनस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासनाचे नियंत्रण याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आयुष नेगीच्या दुर्दैवी मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.










































