पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६ – सध्या माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात नागरिकांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण, महा-पारेषण कंपन्यांकडून जुने वीज मीटर बदलून अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. मात्र माणगाव तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांनी या मीटर बसवण्याला विरोध दर्शविला आहे. याकरिता लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे सर्वसामान्य ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विश्वासात घेऊन कंपन ने मीटर बसवावे अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची याविरोधात भूमिका आहे. याबाबत माणगाव तालुक्यातील शिवसेना पक्षाकडून माणगाव तहसीलदार, माणगाव पोलीस निरीक्षक व महावितरण अभियंता यांना तशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

हे निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हा चिटणीस डॉ अमेय (परेश)उभारे, विद्युत वितरण कंपनी अभियंता करंदेकर, माजी सभापती तथा नगरसेवक अजित तार्लेकर, माणगाव शहर संघटक अनिल सोनार, युवासेना शहर अधिकारी अजिंकेश जाधव, युवासेना पदाधिकारी वैभव शेठ, बेबीन नायर, रविश गोटेकर, इब्राहिम करेल, ऋषिकेश मोरे, अथर्व हाटे, हार्दिक काते, अविष्कार गायकवाड, शारुख अफवारे आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक अजित तार्लेकर व शिवसेना जिल्हा चिटणीस डॉ अमेय (परेश) उभारे म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य जनता यांची मानसिकता ओळखून त्यात काही त्रुटी असल्यास त्यांना समुपदेशन करून व स्मार्ट मीटर बाबतीत जनजागृती करूनच कंपनीने मीटर बसवावे. यामध्ये मीटरचे फायदे, तोटे हे वीज वितरण कंपनीकडून नागरिकांना समजले पाहिजेत. अन्यथा नागरिकांचा अदानी स्मार्ट मीटरला विरोध असल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभा राहून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.


































