पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. ८- श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर शेतकरी व बागायतदारांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने श्रीवर्धन येथे ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. दुष्काळाच्या संकटात शासकीय मदतीच्या किचकट निकषांमुळे प्रत्यक्ष नुकसानग्रस्त लहान शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी मदतीची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
श्रीवर्धन तालुक्यात अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या एकसंध क्षेत्राऐवजी १० ते १५ गुंठ्यांपर्यंतची छोटी-छोटी शेती आहे. अनेक ठिकाणी एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक सहधारकांची नावे असल्याने केवळ क्षेत्रफळाच्या निकषावर मदत निश्चित केल्यास प्रत्यक्ष नुकसान झालेल्या लहान भूधारकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गुंठेवारी शेती, सहधारकांची संख्या अथवा सातबारा उताऱ्यावरील तांत्रिक नोंदी मदतीच्या आड येऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली. लहान भूधारकांसाठी स्वतंत्र व सुलभ निकष निश्चित करून प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, तसेच बागायतदारांच्या खात्यावर मदतीची रक्कम थेट जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली.
शेतकऱ्यांचे हेलपाटे थांबवा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुलभ करावी. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकरी व बागायतदारांची विद्युत बिले माफ करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
बाधित शेतकऱ्यांना मदत केंद्रातून मार्गदर्शन
रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय कदम, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, दक्षिण रायगड महिला संघटिका डॉ. स्विटी गिरासे, तालुका प्रमुख अरुण शिवगण, उपतालुका प्रमुख सचिन गुरव, गजू भाटकर, विभाग प्रमुख विनोद साळवी, गजानन कदम, उपविभाग प्रमुख विजय कदम, शहर संघटक साहील यादव, उपशहरप्रमुख भोकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामार्फत दुष्काळामुळे बाधित शेतकरी व बागायतदारांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना शासकीय मदतीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुक्यातील बाधित शेतकरी व बागायतदारांनी आपल्या अडचणी, कागदपत्रांशी संबंधित समस्या आणि शासकीय मदतीबाबतच्या अडथळ्यांसाठी मदत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.












































