पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २५-ताम्हिणी घाटातील दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. घाटातील महिंद्रा थार वाहनाचा अपघात झालेल्या परिसरातील सुमारे २० फूट खोल दरीत मृतदेह दिसून आला.
मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरी खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली. रेस्क्यू पथकाच्या सहकार्याने मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून ती नेमकी कोण आहे, तसेच तिचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत माणगाव पोलीस तपास करीत आहेत. महिलेचा अपघात होऊन मृत्यू झाला की तिला मारून मृतदेह दरीत फेकण्यात आला, या दोन्ही शक्यता तपासल्या जात असल्याची माहिती आहे.
घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी आवश्यक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून परिसरातील बेपत्ता व्यक्तींबाबतही माहिती घेतली जात आहे. दरम्यान, थार वाहनाचा अपघात आणि त्याच परिसरात दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या घटनेमागे घातपात आहे की अपघात, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.










































