पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. १- तालुक्यातील वीट येथून चोरीस गेलेला ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि पाळीचा मोगडा करमाळा पोलिसांनी ४८ तासांत जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी विजयकुमार महादेव गाडे (वय ६३, व्यवसाय- शेती, रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या मालकीचा मौजे वीट हद्दीतील शेती गट नं. ८१३ मधील पत्र्याच्या शेडमध्ये लावलेला पुढील मुद्देमाल चोरीस गेला होता. ३,५०,००० रुपये किमतीचा सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH 45 F 8019, चेसिस नं. DZYSW259723/3) आणि २५,००० रुपये किमतीचा पाळीचा मोगडा असा एकूण ३,७५,००० रुपयांचा मुद्देमाल दि. २५ सप्टेंबर दुपारी ३ ते दि. २६ सप्सटेंबर काळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने चोरून नेला होता. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुरनं. ८९३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणातून तपास
या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल इसामिया बहिरे, रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, अर्जुन गोसावी आणि गणेश शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळवली.
तपासादरम्यान आरोपी १) दिपक रामदास बरडे, वय ३२ वर्षे, रा. विखलठाण नं. ०१, ता. करमाळा, जि. सोलापूर, मूळ रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड आणि २) आकाश रामदास बरडे, वय २६ वर्षे, रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, त्यांच्याकडून संपूर्ण ३,७५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोफौ हणुमंत जाधव करीत आहेत.
या कारवाईसाठी अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक; विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक; अंजना कृष्णा व्ही.एस. (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग; तसेच रणजीतमाने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काम केले.
सदर कामगिरीत सहा. पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, हणुमंत जाधव सहा.पो.उपनि., वैभव ठेंगल, इसामिया बहिरे, रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे जहिरान नाईकवाडी यांनी सहभाग घेतला.












































