पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- रायगड जिल्हा पालकमंत्री भरत गोगावले व महाराष्ट्र युवा सेना कोअर कमिटी सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या संकल्पनेतून तसेच ECM पॉलिटिकल कॅम्पेन यांच्या सहकार्याने ‘शिवसेना आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांच्या शिबिराचा शुभारंभ बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी मोर्बा विभागातील चांदोरे ग्रामपंचायत येथे करण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे. शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष सुजित शिंदे, पंचायत समिती सदस्य ज्ञानदेव पदरत, उप-तालुकाप्रमुख प्रकाश गोरीवले, विभागप्रमुख शरीफभाई हर्गे, संपर्कप्रमुख नागेश घाग, प्रसाद देवळेकर, चांदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी शिंदे तसेच हा उपक्रम मोर्बा विभागात राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मोलाचे सहकार्य करणारे राकेश पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ECM पॉलिटिकल कॅम्पेन यांच्या वतीने इंद्रनिल पाटील, चंद्रशेखर दवंडे व मयूर जाधव यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती, प्रक्रिया व मार्गदर्शन केले. ‘शिवसेना आपल्या दारी’ या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असून, मोर्बा विभागातील अधिकाधिक पात्र नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.










































