पोलीस प्रवाह न्यूज
पुणे : दि. २९ – वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका सासवडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. संध्या देशपांडे आणि वसुधा फाउंडेशनच्या अध्यक्ष वसुधा नाईक यांच्या नावे होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये प्रत्येकी दोन विश्वविक्रम नोंदविण्यात आले आहेत. या विश्वविक्रमी कामगिरीबद्दल तिन्ही कर्तबगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचे संस्थापक, संपादक तसेच ३०९ विश्वविक्रमांचे मानकरी डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते वसुधा नाईक, मधुकर्णिका सासवडे आणि ॲड. संध्या देशपांडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. घाणेकर म्हणाले की, कोणताही विश्वविक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, सर्वोच्च ध्येय, निर्णयक्षमता, मनाची एकाग्रता, कार्यतत्परता, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आवश्यक असते.
मधुकर्णिका सासवडे यांनी ११० प्रकारच्या मधाचा संग्रह केला असून, गेल्या २० वर्षांपासून ‘मधमाशी वाचवा, विश्व वाचवा’ हे अभियान राबवित आहेत. तसेच ४० हजारांहून अधिक वंचित व दिव्यांग बालकांकडून प्रबोधनपर गीते सादर करून घेतली आहेत. वसुधा नाईक गेल्या १५ वर्षांपासून दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी सातत्याने सामाजिक योगदान देत आहेत. तसेच त्या दरवर्षी पाच अनाथ बालकांना दत्तक घेतात. ॲड. संध्या देशपांडे गेल्या ४० वर्षांपासून गरजू नागरिकांना मोफत कायदा सल्ला देत असून, २०१२ पासून कर्करोगग्रस्त रुग्णांना सातत्याने समुपदेशनाचे कार्य करीत आहेत. कार्यक्रमाचे संयोजन सुनंदा कुलकर्णी आणि पद्मा वेदपाठक यांनी केले. भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. वसुधा नाईक यांच्या हस्ते डॉ. मधुसूदन घाणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मधुकर्णिका सासवडे आणि ॲड. संध्या देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा मधुरंग संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक यांनी विश्वविक्रम करणाऱ्या तिन्ही महिलांचे अभिनंदन केले. स्त्रीशक्तीचा कायम सन्मान करणाऱ्या डॉ. घाणेकर यांचे विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदान गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचा उपक्रम विनामूल्य व निरपेक्षपणे राबविल्याबद्दल श्रीनिवास तेलंग यांनी डॉ. घाणेकर यांचा विशेष गौरव केला. याच कार्यक्रमात डॉ. मधुसूदन घाणेकर संपादित ‘विश्वविक्रमी डहाळी’ या अनियतकालिकाच्या ११९२व्या विशेषांकाचे प्रकाशन सुनंदा कुलकर्णी, पद्मा वेदपाठक, श्रीनिवास तेलंग आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम ‘सांजभेट’ आणि ‘होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.












































