पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. २४- महिला व बालविकास विभाग जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ यांच्या तीन टक्के निधीतून श्रीवर्धन बसस्थानकात स्तनदा माता व बालकांसाठी सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ सुरु करण्यात आला आहे.
श्रीवर्धन हे तालुक्याचे केंद्र असल्याने शासकीय कामानिमित्ताने तसेच उपजिल्हा रुग्णालय असल्याने येथे अनेक महिला वर्ग आपल्या तान्ह्या बाळा सह येत असतात. अनेकदा प्रवासादरम्यान अथवा शासकीय कार्यालयांतून मातांना आपल्या लहान बाळांना स्तनपान करण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी सुरक्षित आणि हक्काची जागा मिळत नाही. महिलांची हीच अडचण ओळखून महिला व बालविकास विभागाने या हिरकणी कक्षाची निर्मिती केली आहे.
या हिरकणी कक्षाची रचना अत्यंत आकर्षक करण्यात आली आहे. कक्षात मातांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था, लहान बाळांसाठी पाळणा, खेळणी, महिलांना मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी संच आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. कक्षात महिलांची आणि बाळांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. कक्षाच्या भिंतींवर बालसंगोपन व आरोग्याविषयी संदेश देणारे सुंदर फलक लावण्यात आले आहेत.कक्षाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने महिलांना अधिक सुरक्षित वाटणार आहे.











































