पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी, दि. ७- संत तुकाराम नगर व वल्लभनगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पाणीपुरवठ्याच्या दिवशी वीज खंडित झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या गंभीर समस्येबाबत युवा सेना महानगर प्रमुख संतोष म्हात्रे यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मुंढे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू आवळे हे देखील उपस्थित होते.
वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे तातडीने शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी तसेच नियोजनातील हलगर्जीपणाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. “नागरिकांनी वीजबिल वेळेत भरणे अपेक्षित असेल, तर महावितरणनेही नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे,” अशी भूमिका संतोष म्हात्रे यांनी मांडली. वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.












































