पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १२- संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर दि. २६ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन राज्य शासनाने गोरगरीब व गरजु लोकांसाठी शिवभोजन ही योजना सुरू केली. आजमितीस संपूर्ण राज्यात सुमारे २ लाख नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र सुमारे ९ ते १० महिन्याचे अनुदान शासनाकडून शिवभोजन केंद्र चालकाना शासनाकडून देण्यात आले नाही. हे अनुदान थकीत आहे. याकरिता राज्यातील सर्व शिवभोजन केंद्र चालकांनी १३ जानेवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद ची हाक पुकारली आहे . या बंदमध्ये माणगाव तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील सर्व शिवभोजन चालकांनी कोणतेही विघ्न न आणता सहकार्य करून या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माणगाव तालुक्यातील विळे विभागातील जेष्ठ महिला सामजिक कार्यकर्त्या व शिवभोजन केंद्र चालिका देविका देवेंद्र पाबेकर यांनी केले आहे.
या योजनेच्या माध्यमातून सन २०२० पासून शहरी भागासाठी प्रति थाळी ४०/-, तर ग्रामीण भागासाठी प्रति थाळी २५/- इतके अनुदान मिळत होते. मात्र मागील आठ ते नऊ महिन्यांपासून हे अनुदान थकीत राहिले आहे. ते लवकरात लवकर निर्गमित करावे. आम्ही महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , पुरवठा विभागाचे मंत्री यांच्याशी वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. तरी या सर्व शिवभोजन केंद्र चालकांच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता १३ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेला बंद कुणीही निर्विघ्न न आणता यशस्वी करावा. सहभागी व्हावे असे मत देविका पाबेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.


































