पोलीस प्रवाह न्युज
थेरगाव, दि. २०- थेरगाव परिसरातील गुजरनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात उद्यान परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शिव व्याख्याते अनिल वडघुले यांनी आपल्या व्याख्यानातून शिवकाळाचा ज्वलंत इतिहास उलगडून सांगितला.
शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीमध्ये उद्यान परिवारचे सदस्य, महिला, पुरुष, लहान मुले यांसह उद्यानमध्ये सकाळी व्यायामासाठी येणारे शेकडो नागरिक मिरवणुकीत सामील झाले होते. उपस्थित महिलांनी शिवरायांचा पाळना गायला. छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

यावेळी शिव व्याख्याते अनिल वडघुले यांचे शिव चरित्रावर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना त्यांनी शिवरायांची राजनिती, युद्ध निति, अर्थ शास्त्र, दुरदृष्टी यावर प्रकाश टाकला. तसेच निःस्वार्थ भावनेने स्वराज्य निर्मितीसाठी प्राण गमवावे लागलेले कान्होजी आंग्रे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुर्जर, तानाजी मालुसरे, मुरारबाजी यांसह अनेक सरदार आणि मावळ्यांच्या कार्याचा पराक्रम सांगितला. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राज्यकारभार यावर अंगावर शहारे आणणारा प्रसंग व्याख्यानातुन सादर केला.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघ, योगा गृप, झुंबा गृप सह परिसरातील असंख्य नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुभाष साळुंखे यांनी तर आभार हरिष मोरे यांनी केले.



































