पोलीस प्रवाह न्यूज
म्हसळा, दि. ६- लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई करत म्हसळा तालुक्यातील कृषी अधिकारी व ग्रामसेवक यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना दि. ५ मार्च रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मौजे सकलप, ता. म्हसळा येथील सर्व्हे नं. १५/२ जागेमध्ये घर बांधण्याकरीता ना हरकत दाखल मिळणेकरीता ग्रामपंचायत सारगाव खुर्द येथे जमीन मालक यांनी अर्ज केला होता. केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करून परवानगी प्राप्त करणे व इतर कामे करणेकरिता संबंधित जमिन मालक यांचेकडुन तक्रारदार यांना संमतीपत्र देण्यात आले होते. जमीन मालक यांना नविन बांधकामकरीता ना हरकत दाखला देणेकरीता लोकसेवक कृषी अधिकारी, पंचायत समिती म्हसळा, अत्ति कार्यभार प्रशासक गुप ग्रामपंचायत सारगाव खुर्द बबन लक्ष्मण कांबळे (वर्ग-२) यांनी ५०००/- रूपये लाचेची मागणी केली होती व महिला लोकसेविका ग्रामपंचायत अधिकारी कोमल निवृत्ती रामनबैनवाड या रु.३०००/- लाचेची मागणी करीत असलेबाबत दि. ५ मार्च रोजी ला.प्र.वि. रायगड अलिबाग यांच्याकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०५ मार्च रोजी केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी तडजोडअंती प्रत्येकी रु ४,०००/- लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय सारगाव खुर्द येथील कार्यालयात महिला लोकसेविका कोमल निवृत्ती रामनबैनवाड, ग्रामपंचायत अधिकारी यांचेविरुध्द सापळा आयोजित केला असता महिला लोकसेविका कोमल रामनबैनवाड यांना तक्रारदार यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम रूपये ४,०००/- स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्यूरो ठाणे परिक्षेत्र शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्पान ब्युरो ठाणे भागवत सोनवणे, सापळा अधिकारी अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्यूरो ठाणे सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्यूरो रायगड सरिता भोसले, सापळा पथक पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. रायगड-अलिबाग निशांत धनवडे, पोसई विनोद जाधव, अरुण करकरे, पोह महेश पाटील, परम ठाकुर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, सागर पाटील, पो. शि. नवदीत नांदगांवकर, वाकोजी कोलमकर, अंनत घरत, मोनिका मोरे यांनी केली.




































