पोलीस प्रवाह न्युज
कागल, दि. ४- बँक ऑफ बडोदाच्या सिदनेर्ली (ता. कागल) शाखेच्या मनमानी कारभाराविरोधात व ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत परिसरातील नागरिकांनी व ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात शाखेच्या कारभारात तातडीने सुधारणा न झाल्यास दि. ११ सप्टेंबर नंतर कोणत्याही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, याबाबत शाखेच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
सिदनेर्ली, एकोंडी , बामणी, शेडूर या गावातील नागरिकांच्या सोयीसाठी ही बँक कार्यरत आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही बँकेकडून ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख तक्रारी व मागण्या:
वैद्यकीय मदतीत अडथळा: बँकेच्या एका ग्राहकाच्या गंभीर रस्ते अपघातानंतर उपचारासाठी मदत मागितली असता, युपीआयचे लिमिट संपल्याने व खात्यावर पैसे असूनही पैसे पाठवण्यात अडचणी निर्माण झाल्या. तसेच तातडीने मदत न मिळाल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याची तक्रार आहे.
दुरुस्ती व जुनी खाती: बँक खात्यातील पावत्या वेळेत न देणे, निष्क्रिय आणि मृत खात्यांमधील मूळ रक्कम वारसदारांना परत करताना टाळाटाळ करणे, अशा अनेक तक्रारी आहेत.
अडकलेली प्रकरणे: शासकीय योजनांमधील पात्र कर्जदारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित ठेवणे आणि सिबिल स्कोर पाहून व कोर्सेस चेक करून नियमबाह्य पद्धतीने कर्ज प्रकरणे मंजूर करणे अशा तक्रारींचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांची अरेरावी: बँकेतील काही कर्मचारी व अधिकारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करतात, तसेच मराठी भाषेचा आग्रह धरत असताना हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांमुळे स्थानिक ग्राहकांची हेळसांड होत असल्याचे नमूद केले आहे.
इतर सुविधांचा अभाव: कॅश काऊंटरवर रांगेत तासाभराहून अधिक वेळ थांबावे लागणे, पासबुक मुद्रित करण्यासाठी मशीन बंद असणे, एटीएममध्ये रोख रक्कम वेळेत उपलब्ध न होणे आणि गोल्ड लोनच्या दरांमध्ये तफावत असणे यांसारख्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन शाखेच्या कामकाजात आवश्यक बदल न झाल्यास येत्या ७ दिवसांत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.













































