पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ९- सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे माणगाव येथे किशोरी मुलींसाठी आरोग्य कीट असेंब्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत माणगाव, महाड, अलिबाग, सुधागड आणि म्हसळा या विभागांतील मुलींना वितरित करण्यासाठी सुमारे १३०० आरोग्य कीट तयार करण्यात आले. प्रत्येक कीटमध्ये १७ विविध प्रकारच्या आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
किशोरी मुलींच्या स्वच्छतेविषयक आणि आरोग्यविषयक समस्या दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या आरोग्य कीटच्या माध्यमातून मुलींना वैयक्तिक स्वच्छतेबाबत आवश्यक साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन अश्विनी गणेश समेळ यांनी केले. कार्यक्रमासाठी वनवासी कल्याण आश्रम, माणगाव यांनी जागा उपलब्ध करून दिली. या उपक्रमात सेवा सहयोग फाऊंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवा कॉलेज, किशोरी विकास प्रकल्पातील मुली व पालक तसेच ऑराग्यान फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी एकत्र येत आरोग्य कीट असेंब्लीचे काम पूर्ण केले.
यावेळी किशोरी विकास प्रकल्प प्रमुख आरती नेमाणे, पी.ई.सी. मेंबर वर्षा परब, माणगाव समन्वयक अश्विनी समेळ, रतिक्षा वाढवळ, महाड समन्वयक मनाली तलाठी, म्हसळा समन्वयक भारती शिंदे, सुधागड समन्वयक पूजा लहाने, अलिबाग समन्वयक पल्लवी डाकी आणि संदेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
किशोरी मुलींचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक जागरूकता यांना प्राधान्य देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले. विविध संस्था, स्वयंसेवक, मुली आणि पालक यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमातून किशोरी मुलींच्या आरोग्य संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले.











































