पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २४-माणगाव येथे सेवा सहयोग फाऊंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय ‘नेतृत्व विकास शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. मुलींमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्वतःची ओळख निर्माण करणे तसेच जीवनात योग्य ध्येय निश्चित करून यशाकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती अश्विनी गणेश समेळ यांनी दिली.
शिबिराच्या पहिल्या दिवशी करिअर मार्गदर्शन, कुटुंब माझी जबाबदारी आणि कर्तृत्वपूर्ती, नेतृत्वकला तसेच खेळ या विषयांवर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये फार्मसी कॉलेजच्या उपप्राचार्या माया देसाई, रायगड संघचालक शिवराजजी भागवत, जनकल्याण रक्तपेढी, महाडचे व्यवस्थापक महेश मोरे आणि जावळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नेहा केकाणे यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी मुक्त चर्चा, आत्मविश्वास व सभाधीटपणा आणि निर्णयक्षमता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक माया लाड यांची मुलाखत मुलींसाठी प्रेरणादायी ठरली.
यावेळी सहाय्यक प्रबंधक पूनम घरत, महाड समन्वयक मनाली तलाठी, मार्गदर्शक राकेश तलाठी आणि अमिता मिशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘चला, स्वतःला ओळखूया… नेतृत्वगुण विकसित करूया… आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करूया!’ या प्रेरणादायी संकल्पनेतून आयोजित या शिबिरामुळे सहभागी मुलींना व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन सेवा सहयोग फाऊंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने करण्यात आले. किशोरी विकास प्रकल्पांतर्गत या शिबिराचे नियोजन अश्विनी गणेश समेळ यांनी केले.
या शिबिरात लोणेरे, नवघर, उसरघर, तळेगाव, रेपोली, ढालघर, लोणशी, भादाव, जुना माणगाव, माणगाव, कोस्ते खुर्द, कोस्ते बुद्रुक, कालवण, बामणोली, सुरव, खरवली, चेरवली, बोरघर आणि पेण तर्फे तळे या गावांमधील साधारण ३०० मुली सहभागी झाल्या. सहभागी मुलींना सुरक्षितपणे माणगाव येथे आणणे आणि शिबिरानंतर सुखरूप घरी पोहोचविण्याची जबाबदारी महेश्वरी टेंबे, रचना करकरे, साक्षी चिनके, जयश्री जांबरे, वैभवी भादावकर, अन्वी तेटगुरे, प्रिया मांडवकर, रतिक्षा वाढवळ, मंजुळा लहाने, सानिका यादव, प्रांजली शिगवण, स्नेहा अधिकारी, मनस्वी कालवणकर, उज्वला खडतर, वैष्णवी टेंबे आणि निकीता टेंबे यांनी सांभाळली.













































