पोलीस प्रवाह न्यूज
मापुसा, गोवा : दि. ५ – इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित तिसरी राष्ट्रीय थाई किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप व टायटल बेल्ट स्पर्धा गोवा येथील पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बॉक्सिंग हॉल, मापुसा येथे 2 ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि क्रीडा भावनेत यशस्वीरीत्या पार पडली. या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून खेळाडूंनी सहभाग घेतला. कॅडेट, ज्युनियर आणि सीनियर मुला-मुलींच्या विविध गटांसह महिला व पुरुषांच्या राष्ट्रीय टायटल बेल्ट विभागातही सामने घेण्यात आले. अमॅच्युअर तसेच टायटल बेल्ट सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडविले.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. विवेक पवार, उपसंचालक, क्रीडा व युवा व्यवहार विभाग, गोवा शासन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष म्हात्रे, अध्यक्ष, इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशन तसेच सी.ए. अरविंद भोसले, संचालक, अवकारिका फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रोहित पवार, योगेश कवळे, ग्रँडमास्टर समीर पांढरकर, अविनाश पवार, अभिषेक शहा, किरण माने, अमित पाल, तेजल पवार, ओम पांढरकर, सेजल पवार, नितीन शहा, कुणाल जोगदंड, आदित्य अडागळे आणि वैश्णवी भागवत यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, प्रशिक्षक, पंच व आयोजक उपस्थित होते.
🏆 राष्ट्रीय टायटल बेल्ट विजेते
👧 महिला विभाग
🥇 –55 किलो — सायली घोडके — महाराष्ट्र
🥇 –65 किलो — वैश्णवी भागवत — महाराष्ट्र
🥇 +65 किलो — शरयू संतोष म्हात्रे — महाराष्ट्र
👦 पुरुष विभाग
🥇 –45 किलो — आनंद लांडगे — महाराष्ट्र
🥇 –55 किलो — प्रतीक लांबडे — महाराष्ट्र
🥇 –65 किलो — वैशांक प्रदीप — कर्नाटक
🥇 –75 किलो — केशव गौतम — कर्नाटक
🥇 +75 किलो — कुणाल जोगदंड — महाराष्ट्र

सर्व टायटल बेल्ट विजेत्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचे राष्ट्रीय टायटल बेल्ट प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र ठरला राष्ट्रीय विजेता
एकूण सांघिक कामगिरीमध्ये महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले, तर कर्नाटक संघाने उपविजेतेपद मिळविले.महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध वजनगटांमध्ये दमदार कामगिरी करत सर्वाधिक प्रभावी प्रदर्शन केले आणि सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. कर्नाटक संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेच्या सामन्यांचे सुरळीत आयोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी अभिषेक शवा यांनी रिंग इन्चार्ज म्हणून पार पाडली.अविनाश पवार यांनी टेक्निकल डायरेक्टर म्हणून स्पर्धेच्या तांत्रिक बाबींची जबाबदारी सांभाळली, तर समीर पांढरकर यांनी चॅम्पियनशिप सेक्रेटरी म्हणून प्रशासकीय व आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. स्पर्धेतील सामने किरण माने, अमित पाल, आदित्य अडागळे, तेजल पवार आणि ओम पांढरकर या पंचांनी निष्पक्ष व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले.
थाई किकबॉक्सिंगच्या विकासासाठी व्यापक दृष्टी
स्पर्धेच्या यशस्वी समारोपानंतर बोलताना इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी सांगितले की, खेळाडूंना दर्जेदार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि थाई किकबॉक्सिंग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे, हे फेडरेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कॅडेटपासून सीनियर स्तरापर्यंतच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी, तसेच महिला आणि पुरुष खेळाडूंना प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय टायटल बेल्टसाठी स्पर्धा करता यावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिसरी राष्ट्रीय थाई किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप व टायटल बेल्ट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक, पंच, तांत्रिक अधिकारी, आयोजक, स्वयंसेवक आणि सहभागी राज्यांच्या संघांनी दिलेल्या सामूहिक योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.













































