पोलीस प्रवाह न्युज
अलिबाग, दि. २९- रायगड पोलिस दलाचा विश्वासू आणि कर्तव्यदक्ष श्वान ‘ऑस्कर’ याचे निधन झाल्याने संपूर्ण पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. सात वर्षांच्या सेवाकाळात ऑस्करने आपल्या विलक्षण सूंघण्याच्या क्षमतेच्या बळावर १९४ गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला.
गुन्हे उघडकीस आणणे, तपासाला दिशा देणे आणि आरोपींपर्यंत पोलिसांना पोहोचविण्यात ऑस्करचे योगदान मोलाचे राहिले. आपल्या निष्ठा, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्याने रायगड पोलिस दलाचे नाव अभिमानाने उंचावले. ऑस्करच्या निधनाने रायगड पोलिस दलाने एक विश्वासू आणि निष्ठावान सहकारी गमावला आहे. त्याच्या उल्लेखनीय सेवेला मानाचा मुजरा करत रायगड पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
“कर्तव्याला आयुष्य समर्पित करणाऱ्या वीर योद्धा ‘ऑस्कर’ची निष्ठा, धैर्य आणि सेवाभाव कायम स्मरणात राहील,” अशा भावना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.












































