मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती; शिक्षण, आरोग्य आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या विकासावर तटकरे यांचा भर
पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३१- जावळी येथील श्री गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महाराष्ट्र भूषण आ. ती. श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी विद्यामंदिर येथे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या नूतन प्रवेशद्वाराचे शनिवारी, दि. ३१ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंत ऊर्फ नानासाहेब सावंत होते. रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार सुनील तटकरे यांनी प्रवेशद्वाराला आपले नाव दिल्याबद्दल संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हा राजकीय कार्यक्रम नसून शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणारा सोहळा असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणप्रेमी व्यक्तींनी दूरदृष्टीने शैक्षणिक संस्था उभारल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयाच्या विकासासाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यांनी शाळेच्या इमारती, प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, व्यायामशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा उल्लेख केला. शिक्षणासोबतच तंत्रशिक्षण आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांना महत्त्व देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करताना, कोणतेही सत्तापद नसतानाही समाजासाठी निधी उभारून विविध उपक्रम राबविण्याची त्यांची धडपड प्रेरणादायी असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच सावंत परिवाराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदानाचाही गौरव केला. भविष्यात दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, एमआयडीसी आणि बंदरविकासाच्या माध्यमातून परिसरात औद्योगिक संधी वाढण्याची शक्यता व्यक्त करत स्थानिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रांत प्रगती साधावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष केकाणे, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम भोरावकर (गुरुजी), राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळाराम (काका) नवगणे, जिल्हा परिषद सदस्या दिशा जाधव, सदस्य अस्लम राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, पंचायत समिती उपसभापती मनीषा मालोरे, सदस्या अलका केकाणे व संगीता बक्कम, उणेगावच्या सरपंच शुभांगी शिर्के, लोणशीचे सरपंच सिद्धेश पालकर, होडगावचे सरपंच बळीराम खाडे, गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी, मोर्बाचे सरपंच शौकत रोहेकर, ज्येष्ठ नेते गजानन अधिकारी, अल्ताफ धनसे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, विलास यादव, राजेंद्र शिर्के, नगरसेवक कपिल गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, शैलेश भोनकर, सिद्धांत देसाई आदी उपस्थित होते.
गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक भागोजी शिर्के, शंकर केकाणे, आर. आर. शिर्के, मुख्याध्यापिका नेहा केकाणे, संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि लोणशी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत रोजगाराभिमुख कौशल्ये मिळाल्यास परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास या सोहळ्यातून व्यक्त करण्यात आला.












































