मिसब्रँडेड लेबल दोष व निकृष्ट दर्जाचा संशय असलेल्या अन्नपदार्थांवर कारवाई; अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपीच्या आस्थापनावर धाड
पोलीस प्रवाह न्युज
पनवेल, दि. २५ ऑक्टोबर- दिवाळी व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत M/s. Ajfan International Retails LLP या आस्थापनातील विविध अन्नपदार्थांचा एकूण ₹४,२१,०६,९६१ (४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये) किमतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थांवर मिसब्रँडेड लेबल दोष आढळल्याने तसेच ते निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली.
सदर आस्थापना प्लॉट क्रमांक १०१ व ११३, जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, कामोठे, पनवेल, जिल्हा रायगड येथे आहे. कारवाईदरम्यान आस्थापनातील अन्नसाठ्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि एनर्जी ड्रिंक्सचा समावेश असलेला साठा आढळला. आस्थापनाचे ॲडमिन मॅनेजर व व्हेंडर कृष्णउन्नी ई. जी. मेनन यांच्याशी संबंधित साठ्याचीही तपासणी करण्यात आली.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई
अन्नपदार्थांच्या लेबलिंग व गुणवत्तेबाबत आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २३, २६ व २७ अंतर्गत तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. संबंधित अन्नपदार्थांवर मिसब्रँडेड लेबल दोष असल्याचे तसेच ते निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईत मिलिंद महागडे, सहा आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी पी. ए. भंडारकर यांच्यासह यू. एस. बडे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, कोकण विभाग), जी. एम. साबळे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय), पावसकर, आढाव, इघारे, माने, गावडे आणि मुलानी यांनी सहभाग घेतला.
प्रकरणात प्रिती टिपरे, सह आयुक्त (दक्षता) आणि सचिन जाधव, सह आयुक्त (कोकण विभाग), ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
दिवाळी व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
— अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य












































