पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ३१ – माणगाव तालुक्यातील इंदापूर परिमंडळातील वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत खैराच्या सोलीव लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत खैराचे सोलीव तुकडे तसेच दोन मोटारसायकली असा एकूण ८४ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माणगाव चे वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
वनपाल सुजित राजमाने (इंदापूर), वनरक्षक अमिना मणेर (कुशेडे), अशोक कोहकडे (इंदापूर), निलेश नाईकवाडे (माकटी) आणि वैशाली भोर (रातवड) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे कशेणे येथील राखीव वन क्रमांक ३०६ परिसरात सापळा रचण्यात आला होता.
दरम्यान, दोन मोटारसायकलींवर गोणीत भरून खैराच्या सोलीव तुकड्यांची वाहतूक करत असलेले चार संशयित दिसून आल्याने वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून मुगवली येथील कालव्याजवळ त्यांना पकडले.
कारवाईदरम्यान २८४ घनडेसी मीटर (1.759 घनमीटर) खैराचे सोलीव तुकडे, अंदाजे किंमत २४ हजार २८६ रुपये, जप्त करण्यात आले. तसेच एम एच ०६ सी आर ५४८५ व एम एच ०६ बी झेड ४५०७ या क्रमांकांच्या दोन मोटारसायकली, अंदाजे किंमत ६० हजार रुपये, जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी नितीन रविंद्र वाघमारे (वय १८), रोशन संतोष जाधव (वय २०), सहदेव तुकाराम जाधव (वय ३०) आणि महेश संतोष जाधव (वय २३), सर्व रा. नगरोली, यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६(१)(फ), ४१(२) व ४२अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, खैराचा सोलीव माल व वाहने असा एकूण ८४ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात परिमंडळ इंदापूर येथे रो.गु. क्र. सी-०५/२०२६ अन्वये दिनांक २१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना २२ जुलै रोजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, माणगाव यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २४ जुलै पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना २७ जुलै २०२६पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित राजमाने (इंदापूर) करीत आहेत.












































