पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ९- सामाजिक, शैक्षाणिक क्षेत्रात आग्रेसर असणाऱ्या माणगाव चारिझेन फाउंडेशनतर्फे तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा गांगवली येथील विद्यार्थ्यांना शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी टिशर्ट वाटप करून फाउंडेशनने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमास उपस्थित फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचे शाळेतर्फे मुख्याध्यापक अशोक जाधव, शिक्षिका नेहा जाधव यांच्यासह विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
चारिझेन फाउंडेशन हे रायगड जिल्ह्यात बहुजन समाजात सामाजिक बांधिलकी ठेऊन आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत. माणगाव तालुक्यात या फाउंडेशनमार्फत महिलांसाठी शिलाई कोर्स, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप, टिशर्ट वाटप, रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भावी नागरिक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शनात करताना सांगितले. हे फाउंडेशन बहुजन समाजात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निस्वार्थीपणे आपले कार्य करीत आहे. तालुक्यातील गांगवली येथील राजिप शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे टिशर्ट फाऊंडेशनने देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. सुरुवातीला चारिझेन फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेश पडवळ यांनी उपस्थित शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण सिसोदे यांनी कॅप्टन निर्मलसिंग रंधावा व त्यांचे सहकारी यांनी चारिझेन फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मौलिक असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा, मार्केटिंग हेड राकेश पडवळ, सदस्य कोशोर झेमसे, सामाजिक कार्यकर्ते भूषण सिसोदे, शाळेचे शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




































