पोलीस प्रवाह न्यूज
दिवेआगर, दि. १- पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांवर दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळाने भीषण घाला घातला. गुरुवारी (१ ऑक्टोबर २०२६) दुपारी पर्यटनासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. समुद्रातील पाण्याचा वेग, प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
४८ जणांचा गट पर्यटनासाठी दिवेआगरमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th मधील २५ मुले, १७ मुली आणि ०६ शिक्षक असे एकूण ४८ जण पर्यटनासाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे आले होते. समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर काही विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि खोलीचा अचानक अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी तीव्र प्रवाहाच्या विळख्यात सापडून वाहून गेले.
दुर्दैवी दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू
या दुर्घटनेत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- यश किरण वानखेडे (वय १६ वर्षे)
- सोहम तुकाराम भांडवलकर (वय १६ वर्षे)
- तन्मय दत्तात्रय वहिले (वय १६ वर्षे)
- कौस्तुभ संदीप दोंड
- कैवल्य सतीश वासनकर
- राजवीर युवराज वहिले
- प्रणव रामदास बनसोडे
- सुमित भारत अहिरे
स्थानिक वॉटर स्पोर्ट्स मालकाचे साहसी प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच दिवेआगर येथील ‘भाऊ मारुती साळूंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्स’चे मालक भाऊ साळूंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात धाव घेतली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी तातडीने शोधमोहीम राबवली आणि आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
पोलीस व प्रशासनाची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी (बोर्ली पंचतन) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत.
दिघी सागरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरू आहे. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दिवेआगर किनारपट्टीवर शोककळा पसरली असून रायगड जिल्ह्यासह पुणे आणि आळंदी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











































