पोलीस प्रवाह न्युज
परंडा, दि. २९- येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रावर नुकताच (२९ ऑगस्ट रोजी) रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संविधानिक मूल्यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. “राखी केवळ मनगटावर बांधली जाणारी परंपरा नसून ती मन, माणुसकी आणि कर्तव्याची गाठ आहे,” असा व्यापक संदेश या वेळी वक्त्यांनी दिला.
या कार्यक्रम प्रसंगी बार्शी येथील ब्रह्माकुमारी संगीता बहेन, परंडा येथील महादेवी बहीण आणि वैराग येथील मीरा बहीण यांची प्रमुख आध्यात्मिक उपस्थिती लाभली होती. तसेच परंडा येथील तरुणांचे मार्गदर्शक, गुरुवर्य तथा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य घुमरे सर आणि उपिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मोरे आणि दयानंद बनसोडे समाजसेवक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी ब्रह्माकुमारी भगिनींनी उपस्थितांना अध्यात्मिक मार्गदर्शन करताना सांगितले की, “रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून तो संपूर्ण समाजात सुरक्षितता, पवित्रता आणि आपुलकी निर्माण करणारा सोहळा आहे. आत्मरक्षण आणि विचारांची शुद्धता ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.”
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. घुमरे सर यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी आपल्या जीवनात उच्च नैतिक मूल्ये, अनुशासन आणि संविधानाने सांगितलेल्या मूलभूत कर्तव्यांची कास धरली पाहिजे. शिक्षणासोबतच संस्कारयुक्त समाज निर्माण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
तसेच, डॉ. आनंद मोरे यांनी आपल्या मनोगतातून आरोग्य, समाजविकास आणि मानवी संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीचा संकल्प करून एका निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगदान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्त्री-सन्मान राखणे, निसर्गाचे जोपासना करणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडण्याचा सामूहिक संकल्प केला. या कार्यक्रमास परंडा परिसरातील नागरिक, महिला व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने सर्वांना ईश्वरनियोजित प्रसाद व ईश्वरीय सौगात भेट देण्यात आली.













































