पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ९- संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ४ जागांपैकी प्रत्येकी २ जिल्हा परिषद गटांवर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असून माणगाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. माणगाव येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.सुनील तटकरे,मंत्री आदिती तटकरे व शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या २ जागा व पंचायत समितीच्या ५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यावर माणगाव तहसील कार्यालय येथील मैदानात शिवसैनिकांनी घोषणाबाजी व गुलालाची उधळण करीत जयघोष केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मोर्बा जिल्हा परिषद गट व मोर्बा पंचायत समिती गणातून तसेच तळाशेत जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गण व साई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. माणगाव तहसील कार्यालय याठिकाणी निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा माणगावचे प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप यांच्या अधिपत्याखाली सोमवार दि.९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतमोजणीवेळी तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता सविता गर्जे व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
माणगाव तालुक्यात ४५ निजामपूर, ४६ तळाशेत, ४७ मोर्बा, ४८ गोरेगाव हे चार जिल्हा परिषद गट येत असून या चार जागांसाठी एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर ८९ पाटणूस, ९० निजामपूर, ९१ तळाशेत, ९२ साई, ९३ वडवली, ९४ मोर्बा, ९५ गोरेगाव, ९६ लोणेरे या आठ पंचायत समिती जागांसाठी एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
विजयी जिल्हा परिषद उमेदवार यादी पुढीलप्रमाणे –
४५ निजामपूर जिल्हा परिषद गट उमेदवार –अविनाश अनिल नलावडे- शिवसेना
४६ तळाशेत जिल्हा परिषद गट उमेदवार –दिशा दिपक जाधव – राष्ट्रवादी
४७ मोर्बा जिल्हा परिषद गट उमेदवार- अस्लम इब्राहिम राऊत – राष्ट्रवादी
गोरेगाव जिल्हा परिषद गट उमेदवार- दिनेश जनार्दन हरवंडकर- शिवसेना
विजयी पंचायत समिती गण उमेदवार
८९ पाटणूस- विलास यशवंत शिंदे- शिवसेना
९० निजामपूर- अक्षय कृष्णा जाधव- शिवसेना
९१ तळाशेत- मनिषा संदेश मालोरे – नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी
९२ साई- संगिता संजय बक्कम – राष्ट्रवादी काँग्रेस
९३ वडवली- पदरत ज्ञानदेव मारुती- शिवसेना
९४ मोर्बा- अल्का सुभाष केकाणे – राष्ट्रवादी काँग्रेस
९५ गोरेगाव- स्वाती अरुण करकरे – शिवसेना
९६ लोणेरे- रवींद्र महादेव टेंबे – शिवसेना




































