पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १०- रायगड जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष वाढत चालला आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रवक्त्या सायली दळवी, रोहा मा. उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनी आमच्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली. त्याला प्रत्युत्तर आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले. मातीत गाडणार, पाय धरायला लागतील, फिरून देणार नाही अशी पदाधिकाऱ्यांची दंडेलशाहीची भाषा राष्ट्रवादीच्या विचारधारेत बसते का? खा. सुनिल तटकरे हे या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार. खा. तटकरे यांच्यावर टीका करण्याची आमच्या पदाधिकाऱ्यांची उंची नाही असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वक्तव्य केले होते. आम्ही मान्य करतो खा. सुनिल टकरे यांच्यावर टीका करण्याची आमच्या पदाधिकाऱ्यांची उंची नाही, मग आमच्या नेत्यांवर टीका करण्याएवढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची उंची कधी वाढली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भरतशेठ, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही असे वक्तव्य केले खासदार सुनिल तटकरे यांनी केले होते. पण भरतशेठ गोगावले यांची नक्कल करून ते उपकार इतक्यात कसे काय विसरले. खा. तटकरे यांनी जाहीर सभेत राजकारणात त्याग करायचा नसतो असे सांगितले होते मग आम्ही राजकारणात पालकमंत्रीपदाचा त्याग का करायचा. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार असून राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावर शिवसेनेचाच हक्क आहे. खा. सुनिल तटकरे यांना विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदारांनी निवडून दिलेले आहे. ते जिल्ह्याचे महायुतीतील जेष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन वाद मिटवून महायुतीतील सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास साधला पाहिजे असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी केले.
माणगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि. १० जून रोजी माणगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगाव तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, तालुका संपर्कप्रमुख प्रताप घोसाळकर, तालुका समन्वयक नितीन पवार, युवासेना तालुका प्रमुख राजेश कदम, विधानसभा संघटक ॲड. सुशील दसवते, महाड विधानसभा समन्वयक निलेश केसरकर, उपतालुकाप्रमुख जगदीश दोशी, गोरेगाव शहर प्रमुख सचिन शिगवण, युवा नेते रोहित रातवडकर, प्रफुल्ल खरंगटे, रविंद्र टेंबे, आदी उपस्थित होते.
यावेळी तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ना. भरत गोगावले यांच्या आदेशाने आम्ही खा. सुनील तटकरे व ना. अदिती तटकरे यांचे काम प्रामाणिकपणे केले. स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशावेळी खा. तटकरे यांनी ना. गोगावले यांच्या रुमालाची नक्कल केली. तिथून हा वाद सुरू झाला. खा. तटकरे यांनी एवढी विकास कामे केली तरी मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकही सीट राष्ट्रवादीला निवडून आणता आली नाही. माणगाव पंचायत समितीवर सुद्धा शिवसेनेचेच वर्चस्व होते. यावेळी सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या चारही सीट निवडून येतील. जे काही उत्तर द्यायचे आहे ते आम्ही सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत देऊ. सुभाष केकाणे यांनी संपर्कप्रमुख अरुण चाळके यांच्यावर वैयक्तिक टीका केली. केकाणे हे अशोक दादा साबळे व राजू साबळे यांचे चेले आहेत. त्यांचे संस्कार त्यांच्यावर आहेत. त्यामुळे केकाणे यांनी वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मोहल्यात मुल्ला, मौलानी यांनी खा. तटकरे यांच्या विरोधात फतवा काढला होता. त्यांना शादाब गैबी यांचा पाठिंबा होता असे समजावे का? असा सवाल यावेळी तालुकाप्रमुख ॲड. मानकर यांनी केला.
तालुका समन्वयक नितीन पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांवर टीका केली. तुम्ही किती गावचे पाणी पिऊन आला आहात. जी विधानसभा निवडणूक पार पडली. त्यात निजामपूर मधील एका पदाधिकाऱ्याने भीष्म प्रतिज्ञा केली होती. जर निवडणुकीत स्नेहल जगताप यांना मताधिक्य दिले नाही तर राजकारण सोडेन. मला वाटलं ते हिमालयात जातील. परंतु, ते पुन्हा तेरा गावचे पाणी प्यायला गेले आहेत. म्हणून टीका करताना संयम बाळगावा. कुवत ओळखून व विचार करून टीका करावी. राष्ट्रवादीचे पदाधिकारी रोज ना. गोगावले यांचे उंबरटे झिजवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव नेतृत्वाला कंटाळून रोज शिवसेनेत गावच्या गावे पक्ष प्रवेश करीत आहेत. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा सज्जड दम यावेळी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना भरला.
तालुका संपर्कप्रमुख प्रताप घोसालकर म्हणाले की, आमचे नेते ना. भरत गोगावले, विकास गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसालकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके यांच्यावर खालच्या पातळीची लोक बोलत आहेत. शादाब गैबी तारखा माणूस ना. भरत गोगावले यांच्याकडे रात्रंदिवस फेऱ्या मारत असतो. त्याने पाच ५ तलावांची कामे हाती घेतली आहेत. त्याने ते सोडावे. शिवसेना पदाधिकारी ती कामे करण्यास सक्षम आहेत. शादाब गैबी यांनी फक्त सांगावे आम्ही कुठे येऊ आम्ही लगेच यायला तयार आहोत. आम्हाला आव्हान देणे तुमचे काम नाही.
































