पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र तसेच संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून आणि श्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राकेश पवार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला ‘पैठणीचा होम मिनिस्टर’ हा उपक्रम गावागावात उत्साहात पार पडला. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच सामाजिक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोर्बा परिसरातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सुर्ले आदिवासी वाडी येथे वसंत कोळी यांच्यासह महिला ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बोर्ले गावात महिला अध्यक्षा श्रीमती सुहासिनी सुखदरे, अध्यक्ष शैलेश यादव, मुंबई अध्यक्ष सचिन दादा, मुंबई ग्रामस्थ संतोष यादव, अरुण यादव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
नाईटणे येथेही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विजय डवले, वैभव डवले, मालोरे काका, अमर मुरकर, सतीश डवले यांच्यासह नाईटणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी विविध खेळ व मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पैठणी भेट देण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात बैठका घेऊन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देत मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला. महिलांना सक्षम करण्याबरोबरच समाजातील विविध घटकांपर्यंत शैक्षणिक, सामाजिक आणि कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.













































