पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २९- तालुक्यातील रेपोली गावची सुकन्या श्रेया राकेश भोस्तेकर हिने यंदाच्या नवरात्रोत्सवात महाकालीचे रूप धारण करून समाज प्रबोधनाचे प्रभावी कार्य केले. तिच्या या उपक्रमाचे तालुक्यातील विविध भागांतून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
नवरात्रोत्सव हा फक्त देवीची आराधना करण्यापुरता मर्यादित न राहता समाजातील वाईट प्रथा, विकृती, व्यसनाधीनता, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर संदेश देण्यासाठी व्यासपीठ म्हणून वापरला जातो. यंदा श्रेया भोस्तेकर हिने महाकालीचे रूप धारण करत समाजातील अन्याय, अंधश्रद्धा, स्त्रियांवरील अत्याचार आणि व्यसनाधीनतेविरुद्ध आवाज उठवला. तिच्या प्रबोधनात्मक संदेशामुळे उपस्थित ग्रामस्थ व पाहुणे भारावून गेले.
श्रेया हिने आपल्या सादरीकरणातून “महाकाली ही फक्त दुष्टांचा संहार करणारी देवी नसून ती स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. प्रत्येक समाजातील व्यक्तीने आपल्या अंतरंगातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगुलपणाचा स्वीकार केला पाहिजे” असा संदेश दिला.
गावातील महिला मंडळ, युवक मंडळ तसेच ग्रामस्थांनी श्रेयाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “श्रेया भोस्तेकर ही केवळ रेपोली गावासाठीच नव्हे तर संपूर्ण माणगाव तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे” अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या. नवरात्र उत्सवात देवतेच्या आराधनेसोबतच समाजजागृतीचा संदेश देण्याची परंपरा अधिकाधिक दृढ व्हावी, यासाठी श्रेयाचे योगदान मोलाचे आहे. तीला आई बाबा आजी आजोबा काका याचे मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे ठरले तिच्या या कार्यामुळे रेपोली गावाचे नाव तालुकाभर उज्ज्वल झाले असून सर्वत्र ठिकाणी तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.




































