पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील लॉजवर अमानुषपणे हत्या करण्यात आलेल्या मुलीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीचे शोधकार्य सुरूच आहे. या हत्या प्रकरणाता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने स्वतःच्याच दोन वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत आलेल्या ओमकार रेसिडेन्सी येथे दि. २० एप्रिल रोजी रुम नंबर १०१ मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोकावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद असल्याने लॉजिंग चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला होता. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली होती. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेस्निक टीम, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल होते. या मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे, वय २२ वर्षे, रा. वडगाव बौध्दवाडी, ता. माणगाव असे आहे.
गोरेगाव पोलिस ठाणे येथे आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार, वय ३८ वर्ष विरोधात हत्या, लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मौजे तलावडे येथील रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी आरोपी गाव सोडून मुंब्रा येथे राहायला गेला होता. स्वतःच्या मुलीच्या हत्या प्रकरणी काही काळ कारागृहात देखील होता. रायगड पोलीस व रत्नागिरी पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आरोपीच्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.


































