पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१ – राज्यात यंदा २७ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झाला आहे. मुंबईतील चाकरमान्यांचा कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येत असतात. माणगाव शहरात सणासुदीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. प्रवाशांना तासनतास बस मध्ये बसून प्रवास करावा लागतो. प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी एस टी महामंडळाने पर्यायी थांबे दिले आहेत.
कोकणात गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दि. २३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट व दि. २ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर मुंबईकडून महाड मार्गे कोकणात जाणाऱ्या गाड्या माणगाव शहरातील हॉटेल खिलार स्वस्तिक कॉम्प्लेक्स येथे थांबणार आहेत. पुण्याकडून कोकणात येणाऱ्या गाड्या निजामपूर रोडवरील पटेल बिल्डर्स रेल्वे ब्रिज जवळ थांबणार आहेत. श्रीवर्धन म्हसळा जाणाऱ्या गाड्या उपजिल्हा रुग्णालय माणगाव जवळ बँक ऑफ बडोदा गेट समोर थांबणार आहेत. तसेच मुंबई कडून कोकणात जाणाऱ्या गाड्या लोणेरे आर्या हॉटेल येथे थांबा घेतील. सर्व प्रवाशांनी प्रवास करताना चढ उतार करण्यासाठी या थांब्यांवर जाऊन एस टी महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन एस टी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.



































