पोलिस प्रवाह न्यूज़
पुणे : दि ३१ – विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे नुकताच पुणे महानगरपालिकेच्या २० विद्यानिकेतन शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात भव्य चित्रकला स्पर्धा व गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर विद्यार्थ्यांनी काढलेल्या बक्षीसपात्र चित्रांचे प्रदर्शन आणि तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या मनावर केलेले प्रभावी प्रबोधन
जंक फूड’ आणि ‘मोबाईल’ देखील व्यसनच!
या प्रसंगी होप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल देवळेकर आणि आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अजय दुधाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. अमोल देवळेकर यांनी आजच्या बदलत्या जीवनशैलीवर प्रकाश टाकताना सांगितले की, दारू, तंबाखू या पारंपरिक व्यसनांसोबतच आजची मुले ‘व्हेप पेन’ आणि ई-सिगारेटसारख्या नव्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. विशेष म्हणजे, ज्यांना आपण साधे अन्न समजतो ते जंक फूड (मॅगी, चिप्स, कुरकुरे) आणि पॅक्ड-फूड देखील कॅन्सर पॉझिटिव्ह असून हे एकप्रकारचे व्यसनच आहे. याशिवाय मोबाईल, इन्स्टाग्राम आणि कॉम्प्युटर गेम्सने मुलांना विळखा घातल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पारंपरिक व्यसनांपेक्षा मोबाईल-सोशल मीडियाचे रुग्ण ६०% पेक्षा जास्त
गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या व्यसनमुक्ती केंद्राचा अनुभव सांगताना डॉ. अजय दुधाणे यांनी खळबळजनक माहिती दिली. त्यांच्या केंद्रात सध्या पारंपरिक व्यसनांपेक्षा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या व्यसनाने ग्रस्त रुग्णांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. तसेच शाळकरी मुलांच्या दप्तरामध्ये ‘ई-सिगार’ व ‘व्हेप पेन’ आढळत असल्याचे सांगत, मुलांना या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रत्येक शाळेत पालक-शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव त्यांनी मांडला. संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे धडे देण्याच्या या उपक्रमाचे दोन्ही तज्ज्ञांनी महासंघ आणि शाळांच्या वतीने कौतुक केले.

गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रत्येक सहभागी शाळेतील छोटा व मोठा गट मिळून १० उत्तम चित्रांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर ‘जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स बॅच ३’ मधील विजेत्यांना ट्रॉफी व मेडल्स प्रदान करण्यात आली. यात संचिता काळोखे हिने चारही परीक्षा प्रकारांत १०० पैकी १०० गुण मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. भूमी म्हस्के, स्पृहा भारांबे, राजीव कनोजिया, देविका लिपणे, कार्तिक पाठारे यांनीही घवघवीत यश संपादन केले. ज्येष्ठ विद्यार्थ्यांमध्ये मनीषा दोरगे आणि उज्वला कामत यांची ‘आऊटस्टँडिंग परफॉर्मर’ म्हणून विशेष निवड करण्यात आली.
मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे प्रमुख कार्यवाहक समीर दरेकर यांनी केले, तर सर्व विद्यानिकेतन शाळांच्या वतीने जयवंत बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रप्रदर्शनाचे यशस्वी नियोजन व मांडणी फारुख तांबोळी आणि हर्षद छल्लारे यांनी केली, तर संतोष जाधव व उमेश इंदापूरकर यांनी सहकार्य केले. कल्पना मोरे, मोईना इनामदार व नियाथ बनसोडे यांनी सूत्रसंचालन व बक्षीस वितरणाची धुरा सांभाळली. याप्रसंगी मुख्याध्यापिका वीणा नाईक, ज्येष्ठ शिक्षक विष्णू सुर्वे यांच्यासह विविध शाळांचे चित्रकला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—












































