पोलीस प्रवाह न्यूज
श्रीवर्धन : दि . २९ – वर्षभर कायदा व सुव्यवस्था राखत जनतेच्या सेवेत तत्पर असलेल्या श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहा दिवस मनोभावे सेवा केलेल्या गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात भावपूर्ण निरोप दिला. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे विधिवत पूजन करून पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचे दहा दिवस भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले. या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असतानाच भक्तिभावाने गणरायाची सेवाही केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनापूर्वी विधिवत पूजा, आरती करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात गणरायाची मिरवणूक काढून विसर्जनस्थळी नेण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या गणपती विसर्जनावेळीही शिस्त, सुरक्षितता आणि संस्कृतीचे भान जपत उत्सव साजरा केला. कर्तव्य बजावताना धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा सुंदर समन्वय यावेळी पाहायला मिळाला.‘वर्षभर जनतेची सेवा, दहा दिवस गणरायाची सेवा’ या भावनेतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणरायाला निरोप दिला. विसर्जनावेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावर उत्साह असला, तरी बाप्पाला निरोप देताना भावुक वातावरण निर्माण झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
श्रीवर्धन पोलिसांच्या या उपक्रमातून कर्तव्य, जबाबदारी आणि संस्कृती यांचा सुंदर मेळ नागरिकांना अनुभवायला मिळाला. जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या मनातही संस्कृती व परंपरेविषयी असलेली आस्था या गणेशोत्सवातून अधोरेखित झाली.












































