पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. २३- श्रीवर्धन येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला धक्का बसला असून ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या शहराला आता पक्षांतराचे ग्रहण लागले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकीटावर थेट मतदारांकडून विजयी झालेले नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
नगराध्यक्ष ॲड.अतुल चौगुले हे श्रीवर्धनमधील एक तरूण आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला या भागात मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. ठाणे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी चौगुले यांनी हाती ‘धनुष्यबाण’ घेतले. या पक्षांतरामुळे श्रीवर्धनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आगामी काळात श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिंदे गटाचे वर्चस्व अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, चौगुलेंचा शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली असून काही दिवसातच तालुक्यातील उर्वरित पदाधिकारी व कार्यकर्ते हाती धनुष्यबाण घेणार असल्याच्या वृत्ताने श्रीवर्धन तालुका म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला ही ओळख पुसण्याचा मार्गावर आहे.असे श्रीवर्धन तालुक्यातील जनतेकडून बोलले जात आहे.
डिसेंबर २०२५ साली झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये श्रीवर्धन शहरातील मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन मला निवडून दिले. श्रीवर्धनच्या जनतेच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. सदरची अपेक्षा पूर्ण करण्याकरिता सत्तेची कास धरणे आवश्यक आहे. श्रीवर्धनच्या भ्रष्टाचार मुक्त विकासाकरिता मी आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहे. सदर प्रवेश करताना माझी शिवसेना ठाकरे गटाबाबत कोणतीही नाराजी नाही. केवळ श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासाकरिता मी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे.- नगराध्यक्ष ॲड.अतुल चौगुले. श्रीवर्धन नगरपरिषद.












































