पोलीस प्रवाह न्युज
ठाणे-, दि. १- ठाणे शहर येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या स्नेहा सुनील करणाळे यांनी हरियाणा, कर्नाल येथे झालेल्या ७५ व्या ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेत बॉडी बिल्डिंगमध्ये रौप्य पदक मिळवून ठाणे पोलीस दलाची शान वाढवली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातर्फे त्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत देशभरातील पोलीस दलातील महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन हरियाणा पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त गृहसचिव सुधीर राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या.
देशभरातून विविध राज्य पोलीस व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे ३७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. या क्लस्टरमध्ये कुस्ती, बॉक्सिंग, बॉडी बिल्डिंग आणि आर्म रेसलिंग या खेळांचा समावेश होता.
स्नेहा करणाळे यांनी ५५ किलो महिला वजनी गटात उत्कृष्ट प्रदर्शन करीत बॉडी बिल्डिंगमध्ये रौप्य पदक पटकावले. यापूर्वीच्या ७४ व्या ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
त्यांची आगामी वर्ल्ड पोलीस गेम्स २०२७ साठी निवड झाली असून, मार्च २०२७ मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्नेहा सुनील करणाळे यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस दलातून आणि क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.












































