पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १८- रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री कुंभार समाज गोरेगाव यांची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. या सभेत जेष्ठ मार्गदर्शक रमेश गोविलकर यांनी एक महत्वाचा नवीन प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व समाजबांधवांनी त्याला संमती दर्शवून प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला.
निर्णयानुसार, समाजातील एखाद्या पुरुषाचे निधन झाल्यास त्यांच्या पत्नीचे सौभाग्य अलंकार जसे की, कुंकू, मंगळसूत्र, अंगठी, कर्णफुले, नथ, पैंजण इत्यादी – तिच्या अंगावरून काढले जाणार नाहीत. ते अलंकार तिच्या पुढील आयुष्यात कायम राहतील.
या ऐतिहासिक निर्णयाबाबत कुंभार समाजाचे जिल्हा खजिनदार अरुण बामणोलकर, कुंभार समाज माणगाव तालुका अध्यक्ष दुर्वास म्हशेळकर, माजी अध्यक्ष गोपाळ सवादकर, माझी उपाध्यक्ष रोहित रातवडकर,विद्यमान अध्यक्ष सुभाष बामणोलकर,उपाध्यक्ष सुनील म्हशेळकर, सल्लगार नथुराम बामणोलकर यांच्यासह सर्व जेष्ठ व तरुण समाजबांधवांनी आपले मनोगत व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले.रायगड जिल्ह्यातील कुंभार समाजातून असा निर्णय घेणारे गोरेगाव हे पहिले गाव ठरले आहे.


































