पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- ग्रुप ग्रामपंचायत काकळ अंतर्गत येणाऱ्या काकळ आदिवासीवाडीतील गेल्या वर्षभरापासून बंद असलेली जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना आता पुन्हा कार्यान्वित होणार आहे. सोलर पंपाच्या सोलर प्लेट्सवर वादळादरम्यान मोठे झाड कोसळल्याने प्लेट्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था ठप्प झाली होती. परिणामी आदिवासी महिलांना पाण्यासाठी पायपीट करत डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते. काकळ आदिवासीवाडीतील ही समस्या माजी पंचायत समिती सदस्या तथा भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रचना निलेश थोरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कामासाठी अंशुल स्पेशालिटी मॉलिक्युल्स कंपनीकडून माध्यमातून सुमारे ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, सोलर पंप व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे.
शासकीय निधी उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने रचना थोरे यांनी हा प्रश्न लायन्स क्लबचे रायगड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संजीव सूर्यवंशी यांच्याकडे मांडला. यानंतर संजीव सूर्यवंशी यांनी अंशुल स्पेशालिटी मॉलिक्युल्स प्रा. लि. कंपनीकडे काकळ आदिवासीवाडीतील पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक सोलर प्लेट्स व इतर साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली. कंपनीने या सामाजिक प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
या उपक्रमामुळे गेल्या वर्षभरापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी काकळ आदिवासीवाडीचे अध्यक्ष रमेश जाधव, सुरेश जाधव, धोंडू जाधव, माजी सरपंच विठ्ठल जाधव, गणपत जाधव यांच्यासह आदिवासी बांधवांनी रचना थोरे, निलेश थोरे, संजीव सूर्यवंशी तसेच संबंधित कंपनीचे आभार मानले.
यावेळी आदिवासी बांधवांनी गेल्या वर्षभरापासून पाण्याची मोठी समस्या भेडसावत असल्याचे सांगितले. अनेक राजकीय नेते व पदाधिकारी वाडीमध्ये येऊन आश्वासने देऊन गेले; मात्र प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. रचना थोरे आणि निलेश थोरे यांच्या माध्यमातून यापूर्वीही परिसरात अनेक विकासकामे झाल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
निवडणुका संपल्या, मात्र जनसेवा थांबलेली नाही
यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी सांगितले की, निवडणुका होऊन गेल्यानंतर राजकारण संपते; मात्र जनतेशी असलेली बांधिलकी संपत नाही. प्रत्येकाच्या सुख-दुःखात आणि अडीअडचणीत मार्ग काढणे, तसेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्याच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करणे, हे भाजपचे संस्कार आहेत. काकळ आदिवासीवाडीचा अत्यंत गरजेचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी अंशुल स्पेशालिटी मॉलिक्युल्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक शिरीष सातपुते यांनी सहकार्य केल्याबद्दल निलेश थोरे यांनी त्यांचे आभार मानले.












































