पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २७- झपाट्याने विस्तार होणाऱ्या आणि मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या व भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव शहरात गुरुवार दि. २६ मार्च रोजी समस्त माणगांवकर हिंदू बांधवांकडून श्री रामनवमी, रामजन्मोत्सव व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हे ४ थे वर्ष असून या शोभायात्रेसाठी थेट आयोध्यवरून श्री रामांची मूर्ती दर्शनासाठी आणण्यात आली होती. शोभायात्रेत श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी माणगांव शहरात हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. जय जय श्री राम गजराने संपूर्ण माणगांव शहर दुमदुमून निघाले होते. कोकणातील सर्वात मोठी श्री राम नवमी माणगाव शहरात शांततेत पार पडली.
ही शोभायात्रेचा प्रारंभ माणगांव विकास कॉलनी येथील श्री साई मंदिर तहसील कार्यालय पटांगण येथून ढोल ताशांच्या गजरात सुरू करण्यात आली. ती पुढे कचेरी रोड ते मुंबई गोवा महामार्ग बाजारपेठ ते बालाजी कॉम्प्लेक्स व परत सोनभैरव मंदिर( खांदाड) येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत तरुणाईने डी जे च्या ठेक्यावर नाचत ‘माणगांव का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलगा’ असा जल्लोष केला. लहान बालकांनी राम, लक्ष्मण, सीता यांचे वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेसाठी संपूर्ण माणगांव शहरात दुतर्फा भगवे झेंडे व भगवी झालर लावण्यात आली होते. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावर भव्य अशा कमानी उभारण्यात आल्या होत्या.

या वर्षी मुख्य आकर्षण श्री प्रभू रामचंद्र भव्य प्रतिमा आणि खास दिल्ली येथून उड्डाण करून करून दाखल झालेले श्री महाबली हनुमान सर्व रामभक्तांना साक्षात दर्शन दिले. भव्य श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती सर्वांसाठी आकर्षण ठरली. तसेच भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदाय टाळ – मृदुंगाच्या गजरात सुश्राव्य भजन करीत रामनामाचा जयघोष केला. यावेळी सर्व रामभक्त साजेशी अशी भगव्या रंगाची वेशभूषा परिधान करून एक वेगळेच आकर्षण निर्माण केले. तसेच लालसर गुलाबी रंग उधळत रामाचा गजर करीत प्रभू रामचंद्रांवरील भक्ती, शक्ती आणि आस्था व्यक्त करण्यात आली. या शोभायात्रे संपूर्ण तालुक्यातून हिंदु बांधव, महिला, श्री राम भक्त व विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातले पदाधिकारी, व माणगांवकर उपस्थित होत्या. सायंकाळ श्री राम मंदिर खांदाड महाआरती करण्यात आली. तसेच सोनभैरव मंदिर खांदाड येथे महाप्रसादाचे देखील नियोजन करण्यात आले होते.
तसेच या उत्सवादरम्यान व शोभायात्रेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता माणगांव पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण माणगांव शहराचे वातावरण भगवेमय झाले होते. माणगांव शहरात नयनरम्य संध्याकाळ श्री राम नवमी निम्मित पहावयास मिळाली. शोभायात्रेसाठी जमलेल्या गर्दीची संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकच चर्चा झाली.


































