पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६- विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विघवली विभाग हायस्कूल, विद्यावली येथे शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संगणक कक्षाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष महादेव बक्कम आणि संस्थेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हृदया नाईक यांच्या हस्ते या संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमासाठी संस्थेच्या सहकार्याने बी. एन. वाय. कंपनी, बेंगळुरू यांच्या सीएसआर निधीतून शाळेला सात संगणक संच, सात टेबल, सात खुर्च्या, आवश्यक साहित्य, प्रिंटर आणि प्रोजेक्टर आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, त्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित व्हावीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. संगणक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना डिजिटल शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी हृदया नाईक यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महादेव बक्कम, चेअरमन नामदेव शिंदे, संस्थेचे सचिव दिलीप उभारे, सहसचिव चंद्रकांत उभारे, सदस्य प्रकाश बैकर, रमेश बक्कम, वसंत साठे, भागोजी ढाकवळ, मधुकर बक्कम आणि मुख्याध्यापक पांडुरंग उभारे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.












































