पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. १२-श्रीवर्धन–दिघी मार्गावरील सकाळच्या एस.टी. बससेवेच्या मार्गाबाबत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. यामुळे बोर्ली ते दिघी दरम्यान प्रवास करणारे पोर्टवरील कर्मचारी, कामगार तसेच मुरूड परिसरात नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूर्वी श्रीवर्धन येथून सकाळी ८ वाजता सुटणारी श्रीवर्धन–दिघी लोकल बस बंद करण्यात आली असून, त्याऐवजी सकाळी ७.३० वाजताची श्रीवर्धन–दिघी–वडाळा बस सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या १० ते १५ दिवसांपासून ही बस कधी थेट दिघी मार्गे, तर कधी सर्वे मार्गे जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. सर्वे मार्गे बस गेल्यास काही प्रवाशांना अधिक तिकीट भाडे द्यावे लागत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
या मार्गावर अनेक कर्मचारी गेल्या १५ ते १६ वर्षांपासून नियमित प्रवास करत आहेत. मात्र, सकाळच्या बसच्या मार्गाबाबत निश्चितता नसल्याने त्यांच्या दैनंदिन प्रवासाचे नियोजन विस्कळीत होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
या समस्येकडे एस.टी. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शहर संघटना व युवासेना, श्रीवर्धन यांच्या वतीने आगार व्यवस्थापकांना तक्रार निवेदन सादर करण्यात आले आहे. युवासेना उपशहरप्रमुख साहिल राजेंद्र सातनाक यांनी या प्रश्नाबाबत पुढाकार घेतला आहे.
पूर्वीप्रमाणे सकाळी ८ वाजताची श्रीवर्धन–दिघी लोकल बस पुन्हा सुरू करावी किंवा सकाळी ७.३० वाजताची बस नियमितपणे थेट दिघी मार्गे चालवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच बसचा निश्चित मार्ग आणि वेळापत्रक स्पष्ट करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी व या समस्येवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. आता या निवेदनाची दखल घेऊन एस.टी. प्रशासन बससेवेबाबत कोणता निर्णय घेते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.












































