पोलीस प्रवाह न्यूज़
माणगाव : दि . २ – लोकशाहीचे संरक्षण, मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराची जपणूक आणि कथित वोट चोरी विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानाचा म्हसळा येथे समारोप झाला. या अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत लोकशाही मूल्ये आणि मतदारांच्या अधिकारांचा संदेश पोहोचविण्यात आला. यानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाची भूमिका आणि आगामी संघर्षाची दिशा स्पष्ट केली.
मतदार याद्यांमधून पात्र मतदारांची नावे वगळली जाणे, मतदार नोंदणी प्रक्रियेतील कथित अनियमितता तसेच एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा, यासाठी मतदारांनी आपली नावे मतदार यादीत तपासावीत आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
यापुढील काळात दिल्लीतील आंदोलनाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत रायगड जिल्ह्यातही जनजागृती आणि राजकीय संवादाची मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या काँग्रेस सत्तेत नसली तरी जनतेच्या प्रश्नांसाठी, न्यायासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी पक्षाचा संघर्ष अविरत सुरू राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गेल्या सात दशकांतील काँग्रेसच्या देशाच्या विकासातील योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावरही टीका केली. आगामी काळात रायगड जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेची खुर्ची नसली तरी जनतेच्या प्रश्नांशी असलेली बांधिलकी कायम आहे. लोकशाही, संविधान आणि सामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारांसाठी काँग्रेसचा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असा संदेश ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानाच्या समारोपातून राजाभाऊ ठाकूर यांनी दिला.












































