उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत शेतकरी व मच्छीमारांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी
पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. २९-उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी उजनी धरणग्रस्त शेतकरी व मच्छीमार संघर्ष समितीच्या वतीने दि. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला ममकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा भाजप नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांनी उजनी धरणग्रस्त शेतकरी व मच्छीमार संघर्ष समितीला लेखी पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर अणुभट्टी (SMR) यांसारखे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांमुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांतील अनेक शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रस्तावित प्रकल्पांमुळे पाणी, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यावरण आणि स्थानिक रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची भीती धरणग्रस्त शेतकरी व मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे पर्यावरणीय व सामाजिक परिणाम तपासून स्थानिक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे बागल यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
शासनाने धरणग्रस्त शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. प्रस्तावित प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे आणि त्यांच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.












































