पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १२- विघवली येथील विभाग हायस्कूल विधवली सन-१९९१ च्या इयत्ता १० वी बॅचचा पहिला स्नेह मेळावा रिव्हर-लैंड रिसॉर्ट माणगाव येथे दि. ८ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
१९९१ साली बाहेर पडलेले हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा तब्बल ३४ वर्षाने एकत्र आले. ८ जून हा जागतिक मैत्री दिन असल्यामुळे तोही एक दुग्धशर्करा योग जुळून आला. तब्बल ३४ वर्षाने भेटत असल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. या स्नेह मेळाव्यासाठी ४५ पैकी ३५ विद्यार्थी हजर होते. विघवली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मोहिते सर व शिक्षिका दांडेकर मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमतः स्वरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीत व प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर गुरुजनांचे व सर्व मित्र-मैत्रिणीचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना हा मैत्रीचा धागा असाच घट्ट धरून ठेवू या असे सांगताना माजी विद्यार्थी भावुक झाले. मुख्याध्यापक मोहिते सर मनोगत व्यक्त करताना भावुक होवून म्हणाले की, हा पहिला स्नेह मेळावा असा आहे जिथे आम्हाला आमच्या माजी विद्यार्थ्यांनी बोलविले. दांडेकर मॅडम मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि तुम्ही असेच स्नेह-मेळावे करत रहा आणि जीवनाचा आनंद घेत रहा असे म्हणून सर्वाना पूढील आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या.
त्यानंतर सर्वानी लगोरी, संगीतखुर्ची, तल्यातमाळ्यात, स्विमिंग, स्नेहभोजण आशा विविध गोष्टींचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांबरोबर कधीही न बोललेली मुलं आणि मुली आज मात्र लहान होवून मोकळेपणाने पुन्हा तेच दिवस जगत होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुवदन सापळे, रंजना म्हात्रे, शंकर उभरे, निशांत साठे, मंगेश जाधव, नथुराम मुंडे, शुभांगी जाधव, जगदीश जाधव आणि मंगेश सुतार यांनी परिश्रम घेतले. केवळ एका आठवड्यात सर्व प्रकारचे नियोजन करून वयाच्या पन्नाशीतील मित्र-मैत्रिणी लहानपणीच्या आठवणीत रममाण झाले.
अशाप्रकारे अतिशय सुंदर आनंदमय वातावरणात १९९१ च्या बॅचचा स्नेह-मेळावा पार पडला. त्यामुळे खऱ्या अर्थाने जागतिक मैत्री दिनाचे सार्थक झाले अशा प्रकारच्या भावना या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.


































