पोलीस प्रवाह न्युज
चिपळूण, दि. ११- डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात एका ७३ वर्षीय रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मानेतील रक्तवाहिनीतील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. मृदुल भटजीवाले यांनी भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि डॉ. गौरव बावीसकर यांच्या मदतीने पूर्ण केली. अशा शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूच्या पक्षाघाताचा झटका येण्याचा धोका असतो कारण रक्तवाहिनी उघडून मेदाची गुठळी काढून टाकुन ती बंद करावी लागते. जर हे २० मिनिटांत केले नाही. तर रुग्णाला अर्धांगवायूचा मोठा धोका असतो. या सर्वच बाबतींचा विचार करून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. त्याच संध्याकाळी रुग्ण चांगले बोलू लागला आणि चालायला लागला. त्याला पाच दिवसांत घरी सोडण्यात आलं.
वालावलकर रुग्णालयात अश्या क्लिष्ट शस्त्रक्रिया महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजने मार्फत मोफत केल्या जात आहेत. अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ सौ. सुवर्णा पाटील यांनी यावेळी दिली.




































