पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ६- रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद विकोपाला चालला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसहित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत खा. सुनील तटकरे यांच्यावर जाहीर टीका केली. त्यावरून संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. बारा गावचे पाणी पिऊन आलेल्या मंडळींना येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चोख उत्तर देऊ असे विधान यावेळी कार्याध्यक्ष सुभाष ठिकाणी यांनी केले.
माणगाव येथील कुणबी भवन येथे दि. ६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चोख प्रतिउत्तर दिले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुकाध्यक्ष बाळाराम (काका) नवगणे, मा. विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर, युवक अध्यक्ष शादाब गैबी, ज्येष्ठ नेते महादेव बक्कम, राम टेंबे, गजानन अधिकारी, युवक सचिव तथा भुवन सरपंच दिपक जाधव, माजी उपसभापती तुकाराम सुतार, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव, महिला तालुकाध्यक्ष संगीता बक्कम, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सोशल मीडिया प्रमुख किशोरी हिरवे, महिला शहर प्रमुख योगिता चव्हाण, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, मा. पं. स. स. शैलेश भोनकर, शहर प्रमुख नितीन वाढवळ, मा. उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, मा. उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, सोशल मीडिया प्रमुख विलास यादव, राजू मोरे, मोर्बा सरपंच शौकत रोहेकर आदी माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्याध्यक्ष सुभाष केकाणे पुढे म्हणाले की, पालकमंत्री पदाच्या वादावरून खा. तटकरे यांना टार्गेट केले जात आहे. ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते बारा गावचे पाणी पिऊन आले आहेत. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर हे किती गद्दार आहेत हे संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहित आहे. विधानसभा निवडणुकीत प्रमोद घोसाळकर यांनी केलेली गद्दारी रायगड जिल्ह्याच्या जनतेच्या समोर आहे. संपर्कप्रमुख अरुण चाळके यांचा फक्त संध्याकाळी जनतेशी संपर्क असतो. दुसऱ्यांना गद्दार बोलणार्यांनी आपण किती महागद्दार आहोत हे पहावे. प्रमोद घोसाळकर यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक लढवावी माझे त्यांना ओपन चॅलेंज आहे. आपले नाव चर्चेत यायला पाहिजे म्हणून प्रमोद घोसाळकर व अरुण चाळके खासदार तटकरे यांच्यावर टीका करत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे. बेताळ वक्तव्य करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा यावेळी सुभाष केकाणे यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष काका नवगणे यांनी अनिल नवगणे यांना खा. तटकरे पाठीमागून वार करतात या टीकेवर प्रत्युत्तर दिले. खासदार तटकरे यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा आणण्याचे काम केले आहे. खा. तटकरे जे समोर दिसत तेवढेच बोलतात. विधानसभा निवडणुकीत युतीचा धर्म आम्ही पाळला आहे. पालकमंत्री पद घोषित झाल्यानंतर शिवसेनेला उपद्री लागली आहे. रेल्वे, महामार्ग प्रश्न सोडवण्याचे काम खा. तटकरे यांनी केले आहे. त्यामुळे अनिल नवगणे यांनी कोणी पाठी मागून वार केला हे आम्हाला शिकवू नये. पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर खा. तटकरे वाईट झाले आधी ते चांगले होते.
बाबुशेठ खानविलकर म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राला खा. तटकरे यांची उंची माहित आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांची खा. तटकरे यांच्यावर टीका करण्या एवढी उंची नाही. जे गद्दार बोलतात त्यांनीच त्यांचा अभ्यास करावा. नेते प्रभाकर मोरे यांच्या जीवावर जे वाढले त्यांनीच त्यांच्या खांद्यावर हात टाकला. गद्दारी हा शब्द खा. तटकरेंना लागू होत नाही. ते फक्त पालकमंत्री पदासाठी हा उपद्रव करीत आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत समजेल कोण किती पाण्यात आहे ते. पालकमंत्री पद रिक्त असल्याने रायगड जिल्ह्याच्या विकासखंडित होत आहे. त्याला कारणीभूत हे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनताच यांचा समाचार घेईल.
यावेळी युवक अध्यक्ष शादाब गैबी म्हणाले की, रुमाल उडवत एका कार्यक्रमामध्ये आ. थोरवेनी गलिच्छ भाषेत जे विधान केले आहे, त्याचा निषेध. खा. तटकरे हे कोकणचे भाग्यविधाते आहेत. ३५% मार्क घेऊन पास झालेल्या आमदाराने अस वक्तव्य करणे योग्यतेचे नाही. थोरवे यांना अपक्ष उमेदवारांने निवडणुकीत चांगलेच लोळवले होते हे त्यांनी विसरू नये. यापुढे खा. तटकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात तसेच माणगाव तालुक्यात फिरू देणार नाही, असा सज्जड दम यावेळी गैबी यांनी दिला.
तसेच युवक सचिव तथा भुवन सरपंच दिपक जाधव म्हणाले की, गद्दार लोकांनी पत्रकार परिषदेत गरळ ओकली आहे. जिल्ह्यातील लहान मुलांना सुद्धा माहीत आहे की, विकास पुरुष कोण आहे. गद्दारी ही पत्रकार परिषद घेतलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या रक्तात आहे. जर खा. तटकरेंवर विनाकारण टीका केलीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यामुळे विरोधकांनी लायकीत राहिले पाहिजे. पालकमंत्री पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठीनी घेतला होता. ते तुम्हाला मान्य झालं नाही. पालकमंत्री पद भेटायला कुवत असावी लागते.
महिला अध्यक्षा संगीता बक्कम यांनी खा. तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध व्यक्त केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेली वक्तव्ये निंदनीय असून आपणच आपली किंमत दाखवून देत आहेत. पालकमंत्री पद ही जी व्यक्ती सक्रिय आहे. जी व्यक्ती काम करते. त्याच्याच गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडेल. आम्हाला विश्वास आहे की राष्ट्रवादीला पक्ष श्रेष्ठी न्याय देतील.
माजी उपसभापती तुकाराम सुतार म्हणाले की, स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारण करीत आहेत. प्रत्येकाने आपला पक्ष जरूर वाढवावा. पण खा. तटकरे यांचे कोकणासाठीचे योगदान कोणीही नाकारु शकत नाही. खा. तटकरे तळागाळात जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे. ते देश पातळीवर काम करतात हे विरोधकांना खुपत आहे. पालकमंत्री व्हायचे असेल तर व्हा आमची काही हरकत नाही. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. रायगडच वातावरण गढूळ करण्याचे काम शिवसेना पदाधिकारी करीत आहेत. समाजाची बांधिलकी असणाऱ्यांनी असे वक्तव्य करू नये. खा. तटकरे देशाचा कारभार उत्तमरित्या करीत आहेत. त्यांचे कोकणासाठीचे योगदान फार मोठे आहे.
उपाध्यक्ष रविंद्र मोरे म्हणाले की, विरोधक दुसऱ्या घरात बसून गरळ ओकत आहे. येत्या निवडणुकीत रुमाल त्यांच्या डोक्यावर ठेवावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे कोणतीही टीका विनाकारण खपवून घेणार नाही.




































