पोलीस प्रवाह न्यूज
सिद्धनेर्ली : दि. १० – महावितरणतर्फे बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट वीज मीटर विरोधात ग्रामस्थ व वीज ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लाल बावटा संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. शिवाजी मगदूम आणि संतप्त विज ग्राहकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत हे सक्तीचे मीटर बसवण्यास तीव्र विरोध दर्शवला.
यावेळी झालेल्या बैठकीत आणि चर्चेदरम्यान, जिओ कंपनीने सुरवातीला इंटरनेट मोफत दिले आणि नंतर त्याचे दर वाढवले, अगदी त्याच धर्तीवर स्मार्ट मीटरमुळे भविष्यात ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
मीटर बदलण्याचे कॉन्ट्रॅक्ट खाजगी कंपनीला दिले असताना, महावितरणचे कर्मचारी ही कामे का करत आहेत? असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच, भविष्यात या मीटरमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याची भीती कॉ. शिवाजी मगदूम यांनी व्यक्त केली. चिखली (ता. कागल) येथे स्मार्ट वीज मीटर जळाल्याच्या घटनेचा दाखला देत, या मीटरमुळे सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
स्मार्ट मीटर सतत डेटा गोळा करत असून ग्राहक घरात कधी असतात आणि कोणती उपकरणे वापरतात याची माहिती ट्रॅक केली जाते. यामुळे नागरिकांच्या खाजगी गोपनीयतेवर (Privacy) गदा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने मीटर बसवणे आणि विरोध केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी का दिली जाते, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला. तसेच १०० युनिटपर्यंत वेगळा दर आणिपुढील युनिट्ससाठी वेगळा दर असण्यामागील औचित्य काय, असा जाबही विचारण्यात आला.लोकभावनेचा आदर करा… माजी सरपंच दत्ता पाटील यांचा प्रशासनाला सल्ला.
यावेळी माजी सरपंच दत्तात्रय पाटील यांनी प्रास्ताविक करताना, प्रशासनाने जनतेच्या लोकभावनेचा व संतापाचा आदर करावा, असा मोलाचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. एकंदरीतच, सिद्धनेर्लीकरांनी स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या विरोधात एकजूट दाखवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी महावितरणचे कागलचे कार्यकारी अभियंता अभय आळवेकर, सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांच्यासह कृष्णात मेटील, नामदेव कुणुरे,अशीश पाटील, योगेश पोवार,मनोहर लोहार, गणेश पाटील, विवेक पोतदार, सनी जत्राटे, सौरभ साठे, संतोष पाटील,युवराज निकम, श्रीनिवास परीट, धनाजी फडतारे, तानाजी पाटील, राजु घराळ,तानाजी मगदूम, अनिल पोवार, राजु मगदूम, सुभाष मगदूम, सोपान मगदूम, सौरभ पोवार, अनिकेत मगदूम, ऋतु मगदूम, चंदर मगदूम, केदारी फडतारे, कतु पोवार, पांडुरंग जत्राटे, दिनकर मगदूम, वैभव मगदूम, आदी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.











































