पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. ३- करमाळा तालुक्यातील देवळाली हद्दीत अवैधरित्या साठवून ठेवलेली गोवा बनावटीची दारू तसेच बनावट दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे बुच जप्त करण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारसह एकूण ४ लाख २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास देवळाली येथील शिंदे वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. करमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना अमोल सदाशिव शिंदे हा आपल्या चारचाकी वाहनातून विक्री करण्यासाठी गोवा बनावटीची दारू साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक अमोल शिंदे याच्या राहत्या घरासमोर पोहोचले. त्यावेळी अमोल शिंदे व त्याचे नातेवाईक तेथे उपस्थित होते. पोलिसांनी घराची व परिसराची झडती घेण्याबाबत विचारणा केली असता अमोल शिंदे, त्याची पत्नी व आई यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
यावेळी अमोल शिंदे याने पोलिसांना विरोध करत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्यासोबत झटापट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचा भाऊ, आई व पत्नी यांनीही पोलिसांना शिवीगाळ करून अमोल शिंदे याला सोडवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर अमोल सदाशिव शिंदे व त्याचा मित्र विकी अंधारे यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, घरासमोर उभी असलेल्या एमएच १२ केवाय ६६९६ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता तिच्या डिक्कीत एक कागदी बॉक्स आढळला. त्यामध्ये ‘Royal Impact Grain Whiskey’ नावाच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. विकी अंधारे याच्याकडे अधिक चौकशी केली असता अमोल शिंदे यांच्या उसाच्या शेतात दारूचे आणखी बॉक्स ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्याने पोलिसांना सदर ठिकाण दाखविले. घरापासून सुमारे १५० मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये दारूचे बॉक्स लपवून ठेवलेले आढळले.
या ठिकाणी वेगवेगळ्या इंग्लिश दारूच्या कंपन्यांच्या नावांचे बनावट बुच (टोपण) प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आढळून आले. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार, २० हजार ९६० रुपये किमतीचे ‘Royal Impact Grain Whiskey’चे १२ बॉक्स, १ हजार ५६० रुपये किमतीचे ‘Officers Choice Blue’ नावाचे २६० बनावट प्लास्टिक बुच, १ हजार ७४० रुपये किमतीचे ‘Royal Stag Seagrams for Maharashtra’ असे लिहिलेले २९० बुच आणि १२० रुपये किमतीचे ‘Impact Blue for Maharashtra’ असे लिहिलेले २० बनावट बुच असा एकूण ४ लाख २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या चौकशीत या रिकाम्या प्लास्टिक बुचांचा वापर मोठ्या बाटलीतील दारू काढून त्यामध्ये हातभट्टीची दारू व इतर रसायने मिसळून बनावट दारू तयार करण्यासाठी केला जात असल्याची माहिती आरोपींकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यावर बनावट बुच लावून १८० मिलीच्या इंग्लिश दारूच्या बनावट बाटल्या तयार केल्या जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, १३२, १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२), ३५२ तसेच दारूबंदी अधिनियमातील कलम ६५(ई), ८०, ८१, ८२, १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वळसणे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वळसणे, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे तसेच पोलीस अंमलदार दीपक घोरपडे, शितल म्हावकर, वैभव ढेंगल, गणेश शिंदे, अमोल रंदील आणि अर्जुन गोसावी यांच्या पथकाने केली.










































