पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २९- गोरेगाव येथील अलहसन इमारतीच्या मधला कॉलमचे काँक्रीट पूर्णपणे निखळून पडल्याने आतील स्टीलचे बार वाकलेले (बेंड) असल्याचे सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. या घटनेमुळे इमारतीमध्ये ३४ फ्लॅट असून त्यामध्ये राहणार्या २६ प्लॅटमधील १२६ रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, ही सोसायटी नोंदणीकृत असून गोरेगाव ग्रामपंचायत दरवर्षी या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावत असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनानाच्या मार्गदर्शनाखाली रहिवाशांचे स्थलांतरणाचे काम सुरु असून जवळपास २५ कुटुंबातील रहिवाशांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर करण्याची तयारी सुरु केली आहे तर इतर कुटुंबियांना उर्दू प्राथमिक शाळेत हलवीण्यात आले.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, ही इमारत २०१२ मध्ये बिल्डर अब्दुला सरखोत यांनी बांधली होती. तसेच इमारतीच्या देखभालीसाठी दरमहा प्रत्येकी ५०० रुपये देखभाल शुल्क आकारले जात असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. दरवर्षी धोकादायक इमारतीच्या नोटिसा देऊनही संबंधित यंत्रणांनी कारवाई का केली नाही? इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी कोणी केली? आणि या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
प्रशासनाकडून तेथील नागरिकांना ताबडतोब हलविले असून, सदर इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. – विपीन लोकरे तहसीलदार माणगाव













































