पोलीस प्रवाह न्यूज
करमाळा : दि. ३० – करमाळा पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत 10 लाख 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 2 लाख 52 हजार 500 रुपये किमतीचा 10 किलो गांजा आणि 8 लाख रुपये किमतीची पजेरो स्पोर्ट कारचा समावेश आहे. करमाळा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मौजे पांगरे ता. करमाळा येथे एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 19/09/2026 रोजी रात्री 8.10 ते 10.00 च्या दरम्यान पांगरे स्मशानभूमीजवळ सापळा रचला. यावेळी संशयास्पद पजेरो स्पोर्ट कार MH-12-KF-8819 ला थांबवून तपासणी केली असता, गाडीत ५ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी २ किलो प्रमाणे एकूण १० किलो गांजा आढळून आला. त्याची किंमत अंदाजे २ लाख ५२ हजार ५०० रुपये आहे.
पोलिसांनी गांजासह गाडीही जप्त केली. या प्रकरणी माढा जि. सोलापूर येथील २४ वर्षीय रोहित शिवाजी केचे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोहेकॉ गणेश ललासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या पथकाने केली.












































